विजयदुर्ग किल्ल्यातील मराठय़ांच्या पराक्रमात अनेक गोष्टीं नेहमी चर्चिल्या जातात, ज्या मध्ये दुर्गरचना, आरमारी गोदी आदींबरोबरच समुद्रांतर्गत तटबंदीचाही समावेश करता येईल. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या किल्ल्यांची दौलत सुमारे साडे तीनशे हुन अधिक वाढवली होती.
त्यातील बहुतांश किल्ल्यांचे काही ना काही गुणविशेष नक्कीच आहेत. आजही आपण अश्याच एका किल्ल्याचा अभ्यास करणार आहोत. या किल्ल्याचं गुण वैशिष्ट्य आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी या किल्ल्याची अगदी जुजबी आणि थोडक्यात माहिती करून घेऊयात.
इ.स. ११९५ ते १२०५ या साली शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचे संरक्षण व देखरेख करण्यासाठी घेरिया किल्ल्याचे बांधला. पुढे या किल्ल्यावर देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. त्यानंतर या किल्ल्यावर विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाची मक्तेदारी होती. नोव्हेंबर १६५३ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेण्याचं मुख्य कारण म्हणजे सिद्दी आणि पोर्तुगीजांच्या आरमारी हालचालींवर लक्ष ठेवणे. पुढे जाऊन हा किल्ला स्वराज्याचं आरमारी ठाणे बनलं.
घेरिया किल्ला स्वराज्यात आल्यावर शिवरायांनी प्रथमतः त्याच्या डागडुजी चे काम हाती घेतले. कारण छत्रपतींनी हा किल्ला घेण्यापूर्वी घेरिया किल्ला हा ५ एकरात वसलेला होता. आरमार वापरासाठी या किल्ल्याचा उपयोग होऊ शकतो म्हणून या किल्ल्याच्या भोवती संरक्षक तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ वाढून ते १७ एकर १९ गुंठे झाले.
या संरक्षक तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले. यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तर दिशेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या चारही बाजूला खंदक होते ज्यात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी हा पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. आज मात्र एका बाजूने मातीचा भराव टाकून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.
तर मुख्य प्रश्न असा की या किल्ल्यावर खरोखरच हेलियम चा शोध खरंच लागला होता का? तर झालं असं की, १८ ऑगस्ट १८६८ त्यादिवशी खग्रास सूर्यग्रहण होते जे भारतातून दिसणार होतं. या ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी, खगोल शास्त्रज्ञ नॉर्मन लॉक्युअर यांनी त्यांना लागणारी उपकरणे घेऊन विजयदुर्गावर आले. किल्ल्यावर दारूकोठाराच्या समोर मुद्दाम बांधून घेतलेल्या सिमेंटच्या दोन ओट्यांवर त्यांनी आपल्या दुर्बिणी लावल्या आणि ग्रहणाचे निरीक्षण केले.
निरीक्षण करत असताना त्यांना सूर्यकिरणांच्या वर्णपटलात त्यांना वायुयुक्त तीन पिवळ्या रेषा दिसल्या. यातील दोन रेषा सोडियम द्रव्याच्या होत्या. परंतु तिसऱ्या रेषेविषयी त्यांची उत्सुकता वाढली. त्यासंदर्भातील तपशील त्यांनी फ्रेन्च ऍकेडमीला लिहून पाठवला.
ग्रहण काळात दिसणाऱ्या या रेषांबद्दल जॉर्जेस रायट, कॅप्टन हैग, नॉर्मन आर. पोगसन, लेफ्टनंट जॉन हर्शल यांनी देखील अशीच माहिती लिहून पाठवली. आणि त्या तिसर्या रेषेचे नामकरण ग्रीक सूर्यदेवतेच्या ‘हेलिआस’ नावावरून हेलियम असे करण्यात आले.
फ्रेन्च ऍकडमीने नॉर्मन लॉक्युअर आणि जॉर्जेस रायट या दोन्ही शास्त्रज्ञांची निरीक्षणे अभ्यासून पाहिली आणि दोघांनाही हेलियमच्या शोधाचे संयुक्त मानकरी ठरवले. एका नवीन मूलद्रव्याच्या शोधात आपल्या छत्रपतींचा विजयदुर्ग किल्ला असा सहभाग म्हटल्यावर एक वेगळंच हसू आपल्या चेहऱ्यावर येतं.
हेलियम चा शोध लावण्यात हा किल्ला देखील तेवढा वाटेकरी असल्याने या किल्ल्याला ‘हेलियम गॅसचे पाळणाघर’ असे म्हटले जाते. हेलियम च्या किंवा त्यादिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा अभ्यास अनेक ठिकाणी करण्यात आला त्यापैकी विजयदुर्ग हा किल्ला होता भविष्याचा अभ्यासकरण्यासाठी इतिहासातील एका किल्ल्याचा उपयोग केला हे मात्र नक्कीच आशादायक आहे.