अहिल्यादेवी होळकरांनी २०० वर्षा पूर्वी बांधलेल्या या विहिरीला टोप बारव का म्हणतात?

एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्या सोबत झाला.

खंडेराव हे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या.

पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.” आपल्या वडलांच्या मायेने सांभाळ करणाऱ्या सासऱ्यांच्या शब्दाला मान देत अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारावर लक्ष केंद्रित केले.

अहिल्यादेवी ओळख इतिहासाच्या पानांत चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून होते. त्यांनी पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार वेळोवेळी बदल केले. करप्रणाली चालू असली तरी सौम्य आणि प्रजा हिताचा विचार करणारी होती. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले त्यामुळे गावातले वाद गावातच मिटू लागले.

डोंगरी मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा अहिल्यादेवींनी आदिवासी समाजाशी संवाद साधून त्यातून सुवर्णमध्य काढत त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली.

जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. अश्याच एका प्रसिद्ध विहिरी अर्थात बारव बद्दल जाणून घेऊयात.

मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरीजवळ कसारा घाटात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी एक  विहीर/बारव बांधली होती. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर इतर विहिरी पेक्षा वेगळी आहे.

साधारणतः प्रत्येक विहिरी या उघड्या असतात कदाचित महाराष्ट्रातील ही एकमेव विहीर असेल जी झाकलेली आहे. सैनिकांच्या शिरस्त्राण किंवा टोप या आकाराची असल्याने याला टोप बारव असे म्हणतात. याचा आकार असा असण्याचा कारण ही तसंच आहे.

ही पूर्वी व्यापाऱ्यांचा प्रवासी मार्ग होता या मार्गावरून मोठ्या प्रमाणात व्यापारी दळणवळण होत असे. हेच लक्षात घेऊन अहिल्यादेवी होळकरांनी प्रवासी करणाऱ्यांसाठी येथे विहीर बांधली. मुख्य रस्त्यापासून केवळ पन्नास फुटांवर ही विहीर असून तिचा व्यास १५ ते २० फुटांपर्यंत आहे. आजही या विहिरीचा वापर स्थानिक लोक पिण्यासाठी वापरतात.

विहीर बांधत असताना त्यांच्या लक्षात आलं की विहीर तसेच बाजूचा परिसर हा संपूर्ण जंगलमय असल्याने जंगली जनावर तसेच आजूबाजूच्या गावातील गुरंढोरं चारायला येत असे प्रवासी वाहतूक असल्याने येणारे प्रवासी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विहिरीला कठडा घातला.

प्राणी व पालापाचोळा त्यात पडू नये म्हणून त्यांनी विहिरीला टोप बांधून घेतला. आयुष्यभर सर्वसामान्यांची सेवा करण्यामध्ये अहिल्याबाईंनी आपले आयुष्य वेचले. स्वतःची पर्वा न करता दुसऱ्याचे आयुष्य सुखकर कसे करता येईल, याकडे त्यांनी नेहमी लक्ष पुरविले. अशा थोर अहिल्यादेवींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

Leave a Comment

You cannot copy content of this page