शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? प्रलयभैरव वीर मुरारबाजी

इसवी सन १६५६ मधे छत्रपती शिवरायांना जावळीच्या स्वारीतून चंद्रराव मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले या रत्नाचे नाव होते – मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे हे मूळचे महाड तालुक्यातील किंजळोली गाव चे रहिवासी.

जावळीच्या खोऱ्यात चंद्रराव मोरे यांच्या सोबत झालेल्या युद्धात छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना मोर्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजी यांच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी यांना स्वराज्य आणि स्वराज्यस्थापनेचा हेतू काय आहे सांगितलं आणि त्यांना स्वराज्यात येण्याची विचारणा केली. छत्रपती शिवरायांचा मान राखत मुरारबाजी यांनी स्वराज्यात येणं पसंत केलं. 

मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली ती पुरंदर च्या लढाई च्या वेळी. इतिहासातील ही सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेनी दिलेरखानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा. स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्याच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते किंबहुना अशक्यप्राय वाटत होत.

या नामुष्कीची चाहूल लागताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजा सोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने इ.स. १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थिती मधेदेखील मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर फार शर्तीने लढवला.

छत्रपती बसरूर मोहिम संपवून स्वराज्यात परत येत असताना त्यांना मिर्झाराजे जयसिंग याच्या आक्रमणाची बातमी समजली. स्वराज्यावर आलेल्या या मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी महाराज लगोलग राजगडावर पोहचले. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि त्यांचे सहकारी दिलेरखान याने पुरंदराला वेढा घातला.

पुरंदरच्या माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. सभासदाच्या बखरीमध्ये याचे वर्णन केले आहे.  ‘पुरंदर किल्यावर स्वराज्यातर्फे मुरारबाजी आपल्या हजार मावळ्यांना घेऊन किल्ला लढवत होते. आपले खात्रीचे निवडक सातशे मावळे घेऊन गडाखाली दिलेरखानला रोखायला सज्ज झाले. दिलेरखान आपल्या पाच हजार ताज्या पठाण सैन्यासह किल्ल्याला वेढा घातला. दिलेरखान आणि मुरारबाजी यांच्यात युद्ध सुरू झाले.

एक वर्षापूर्वी सिंहगडाभोवती मोर्चे लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण यशस्वी झाला होता. मार खाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती.

हे मुरारबाजींना माहीत होते. हीच कल्पना आताही वापरली तर? नाहितरी पुरंदर शेवटच्या घटका मोजतोय, कधीही मोगलांच्या ताब्यात जाऊ शकतो. प्रयत्न यशस्वी झाला तर इतिहास घडेल. हाच विचार घेऊन मुरारबाजीं यांनी गडावरून सुमारे सातशे योद्धे घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे आणि गड राखायचा.

मुरारबाजींनी एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. मुरारबाजी ज्या प्रकारे तलवार गाजवत होते ते पाहून खुद्द दिलेरखान हबकला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले, ‘अय बहाद्दूर, तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ। तुम हमारे साथ चलो। हम तुम्हारी शान रखेंगे! स्वराज्यासाठी प्राण पणाने लढणारे मुरारबाजी चिडून म्हणाले, ‘तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय? असं म्हणत दिलेरखानावर तुटून पडले.

मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येतोय हे पाहून खानाने धनुष्यबाण हाताशी घेतला. धनुष्याचा दोर अगदी कानापर्यंत खेचून मुरारबाजीच्या कंठाचा वेध घेतला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजी यांचा या लढाईत अंत झाला. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली तो दिवस होता १६ मे १६६५

Leave a Comment

You cannot copy content of this page