शिवरायांच्या गनिमीकाव्याचं सर्वोत्तम उदाहरण उंबरखिंड चं युद्ध

छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येत स्वराज्य आणि स्वराज्याचे गडकोट, पण आणखीन काय विचार येतो असं विचारलं तर दहा पैकी आठ जण तरी नक्कीच गनिमीकावा किंवा शिवाजी महाराजांच्या लढाया आठवतील.

स्वराज्यासाठी झालेले युद्ध किंवा युद्धतंत्राचा अभ्यास करताना प्रगल्भ युद्ध तंत्र कसं असावं किंवा युद्धशास्त्र म्हणजे काय असतं या युद्धशास्त्राची छोटीशी चुणूक आपल्याला शिवाजी महाराज आणि कारतलब यांच्यात उंबरखिंडीत झालेलं युद्धात दिसून येते.

पुणे-रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर पुण्याच्या वायव्य दिशेने कोकणात जाताना किंवा खोपोली ते पाली या रस्त्याने जाताना उंबरे गावांजवळ उंबरखिंड सह्याद्री हिरव्यागार झाडीत लपलेली आहे. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढल्या नंतर स्वराज्याची ताकद आता हळूहळू वाढत होती. तिचा बंदोबस्त करण्यासाठी शाहिस्तेखानाने कारतलबखानाला उत्तर कोकण ताब्यात करण्यासाठी मोहिमेवर पाठवले.

अफझलखानासारख्या बलाढ्य सुभेदाराला जर शिवाजी महाराज सहज मात करू शकतात हे कारतलब खान पुरता जाणून होता म्हणून कारतलबखाना ने त्याच्या सोबत २०,००० ची पायदळ आणि घोडदळसोबतच छोट्या तोफा, बंदुका, डेरे, हत्ती, घोडे, बैल असा मजबूत मोगली सरंजाम यांच्या सोबतच अनुभवी सरदार जसे कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव व रायबाघन ही कर्तृत्ववान स्त्री सरदार होती.

कारतलाब खानाचा तळ पुण्यात होता तो तळेगाव मार्गे मळवली आणि मग तिकडून तो लोणावळ्याच्या दिशेने कोकणात उतरणार होता. महाराजांना कारतालब खान कोकणात ताब्यात घेण्यासाठी येणार आहे याची कुणकुण होतीच.

पण खानाला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी, कारतलब खान ज्या मार्गाने जात होता त्या मार्गावर असणाऱ्या लोहगड व विसापूरच्या किल्ल्यावर असणाऱ्या सैनिकांना हल्ला न करण्याचे सक्त आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते, म्हणून महाराजांच्या आज्ञेमुळे यादोन्ही किल्ल्यावरून खानाला कोणताच विरोध झाला नाही.

असं करण्याचं मुख्य कारण म्हणजे घाटावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक वळणावळणाच्या वाटा अन अवघड घाट आहेत. त्यातील एक कुरवंडे घाट हा लोणावळ्यापासून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो. सह्याद्रीचा नव्वद अंशाचा  खडा पहाड उतरून आलं की चावणी गावा जवळ अंबा नदी आहे.

या नदीच्या पात्राच्या बाजूने जाणारी अरुंद चिंचोळी पायवाट घनदाट जंगलातून जाते. यामुळे या मार्गाची रचना नळीसारखी आहे. ही नळीची वाट ठाकूरवाडीच्या टेकडी जवळ रुंद होत जाते. या नळीत एकदा शिरले की, मागील खडा सह्याद्री, बाजूच्या टेकडय़ा व अंबा नदीचे पात्र व पुढील ठाकूरवाडीच्या टेकडीचे मुख यामुळे शत्रू आपसुकच कोंडला जातो. उंबरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे म्हणून तिला उंबरखिंड म्हणतात.

कारतलबखानाला उंबरखिंडीत खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेणजवळ सैनाचा पहारा मजबूत ठेवला. त्यामुळे खानाला  कुरवंडा घाटाने उतरण्यावाचून पर्याय नव्हता कारण खानाला कोकणात उतरायचं होतं, खान फौज घेऊन अवघड घाट उतरू लागली.

सह्याद्रीचा हा अवघड मार्ग चढत फौज दुपापर्यंत कशीबशी चालत चावणी गावात आली. जानेवारी महिना असल्यामुळे अंबा नदीला पाणी जवळ जवळ नव्हतेच. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हाने व घाट उतरल्यामुळे गलितमात्र झाली होती. अश्या अवस्थेत सुध्दा खानाने सैन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सैनिक आता उंबरखिंडीच्या त्या चिंचोळ्या नळीत शिरले.

बाजूच्या टेकडयांमुळे व घनदाट जंगलामुळे मराठयांना नैसर्गिक संरक्षण मिळत होतं. शिवाजी महाराजांनी संधीचा फायदा घेत जंगलात लपलेल्या मराठयांनी खानावर हल्ला चढवला.

खानाची फौज मराठ्यांकडून सपासप कापली जात होती. खानाला आणि त्यांना हल्ला नेमका कुठून होतोय आहे तेच कळत नव्हते. त्यात खानाच्या सैन्याला खबर मिळाली की शिवाजी महाराज स्वत: ठाकूरवाडीच्या टेकडीवर सैन्य घेऊन उभे आहेत, त्यामुळे खानाचे सैन्य भीतीनेच गार झाले.

खानाला मागे सह्याद्रीचा खडा पहाड चढणे शक्य नव्हते, उत्तर कोकण च्या बाजूला नेताजी पालकर तयारीत च होते. अशा भयंकर परिस्थितीत शरण जाण्यावाचून खानाला पर्यायच नव्हता. पण खान हटायला तयार नव्हता. त्याच्या जवळ असलेल्या सरदारांनी खानाला दबावात आणले. सारी परिस्थिती पाहता कारतलबखानाबरोबर असलेल्या रायबागन या शूर महिला सरदाराने खानाला शरण जाण्याचा सल्ला दिला.

शेवटी नाराजीनेच त्याने महाराजांकडे अभयदान मागण्यासाठी वकील पाठवला. वकिलाने महाराजांजवळ बिनशर्त शरणागती पत्करली. आणि महाराजांजवळ अभयदान मागितले.

महाराजांनी खंडणी आणि मुद्देमाल आणि साधनसामग्री खानाला तसेच सोडून जाण्याचा हुकूम दिला. नाईलाजाने खानाचे सैन्य रिकाम्या हातांनी परत पुण्याकडे गेले. उंबरखिंडीत झालेल्या या युद्धात खानाचा सपशेल पराभव झाला.

मोगलांचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्रे हे साहित्य मराठ्यांना मिळाले. कारतलब खानाच्या एवढया मोठ्या सैन्याला काही मूठभर मराठयांनी गनिमीकाव्याने २ फेब्रुवारी १६६१ रोजी सहज मात दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page