का म्हणतात तोरणा किल्ल्याला गरुडाचे घरटे?

छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य उभं केलं ते त्यांच्या सेवेला असणाऱ्या सवंगडी आणि स्वराज्यासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या विश्वासू शिलेदारांच्या योगदाना मुळे पण या सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली ती सह्याद्री ने आणि सह्याद्रीच्या कुशीत स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या किल्ल्यांमुळे.

सह्याद्रीच्या या किल्ल्यांचे स्वराज्यासाठी योगदान तर आहेच पण त्या सोबतच काही किल्ल्याचं भौगोलिक म्हणा किंवा ऐतिहासिक म्हणा किंवा किल्लेदार किंवा स्वराज्याच्या कर्तबगार मराठ्यांच्या पराक्रमामुळे त्या किल्ल्याला वेगळी किनार नक्की लाभलेली आहे. अशीच एक वेगळी किनार लाभलेला एका किल्ल्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी म्हणजे इ.स. १६४७ साली अगदी पहिलाच प्रयत्नात घेतलेला किल्ला म्हणजे किल्ले तोरणा. स्वराज्य स्थापनेचं तोरण या किल्ल्यापासून झालं.

गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा असं म्हणतात. काही इतिहासाकरांच्या मते स्वराज्याचं तोरण या किल्ल्यावर बांधल्यामुळे या किल्ल्याला तोरणा म्हणतात खरं खोटं इतिहासाच्या पानांत दडून बसलंय. महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.

तोरणा किल्ल्याचे बांधकाम किंवा याची निर्मिती कधी झाली याचा उल्लेख कुठे नाहीये. पण असं दंत कथा सांगितली जाते की या किल्ल्याची निर्मिती तेराव्या शतकात शैव पंथानी याची निर्मिती केली.

गडावर प्रवेश केल्यानंतर लगेच मेंगाई देवीचे मंदिर आहे. काही स्थानिकांच्या मते त्या देवीला तेरणजी म्हंटले जायचे. किल्ल्यावर बिनी दरवाजा, हनुमान गड, बुधला माची, झुंजार माची, कोठी दरवाजा, बाले किल्ला, दारूगोळ्याची कोठार, ढालकाठी ची जागा, म्हसोबा चे टाके, अशी पाहण्यासारखी आणि विलक्षण सुंदर ठिकाणं आहेत. पावसाळ्यात या गडावर बरेच पर्यटक भेट द्यायला येतात.

तोरणा किल्ला पहायला जसे भारतीय येतात तसेच विदेशी पर्यटक सुद्धा येतात त्या पैकी तोरणा किल्ल्याच्या भौगोलिक रचनेमुळे एक इंग्रज लेखक मोठ्या कौतुकाने म्हणतो तुम्ही जर सिंहगड पाहून त्या गडाला सिंहेची गुहा म्हणत असाल, तर तुम्ही तोरणा किल्ल्यावर या तोरण्याची उंची आणि किल्ल्यावर घोंगावणारं सह्याद्री च वारं तुम्हाला गरुडाच्या घरट्याची आठवण होईल.

पुढे जेंव्हा औरंगजेब ने हा किल्ला जिंकला. तेंव्हा याचे नाव ‘फुतूहुल्घैब’! असे ठेवले. कारण फुतूहुल्घैब चा अर्थ होतो ‘दैवी विजय. औरंगजेब चा किल्लेदार हातमखानाने ला किल्ल्याबद्दल लिहून ठेवलंय की, देवाचा घात झाला आणि मी या किल्ल्यावर अडकून पडलो.

या सह्याद्रीच्या वाऱ्याने या किल्ल्यावर भूत पिशाच्च यांचा भास होतो. किल्ल्याच्या आजूबाजूला पसरलेल्या भयानक दऱ्या मला नरकाची आठवण करून देतात. कारण या किल्ल्याच्या उंची मुळे या किल्ल्यावरून पाहिलं असता आपण पाताळात जाऊ अशी भीती वाटते. तोरणा खरोखरच आकाशात उंच गरुडाने बांधलेल्या घरट्याप्रमाणे जाणवते.

Leave a Comment

You cannot copy content of this page