थरारक सांदन दरी

सह्याद्रीत भटक्यांसाठी अनेक थरारक ठिकाणे आहेत. सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या लोकांनाच माहिती होती. परंतु नंतरच्या काळात भटक्यांचा ओघ वाढला, गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि खऱ्या अर्थाने इतके दिवस अज्ञात असलेली ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहिती पडली. असेच एक ठिकाण म्हणजे सांदन दरी.

भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला बाजूला सभोवतीच्या निसर्गशिल्पांच्या गराड्यात मधोमध साम्रद नावाचा आदिवासी पाडा वसला आहे. तिथून चालत चालत आपण रतनगडाच्या दिशेने येतो. अवघ्या १०/१५ मिनिटात आपण एका भल्या मोठ्या घळीच्या मुखाशी पोहोचतो. तेच या प्रसिद्ध अशा सांदण दरीचे मुख आहे.

विशेष म्हणजे ही दरी जमिनीच्या पातळीखाली आहे. या दरीत जाण्यासाठी थोडेसे खाली उतरावे लागते. वसुंधरेच्या गर्भातील एक नितळ आनंद देणारी वाट तुडवताना जणू सृष्टीच आपल्याशी काही गूज सांगू पाहतेय, असेच पावलागणिक वाटत राहते! अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब, जमिनीला पडलेली भेग आहे.

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल. ही आपल्या देशातील अशा प्रकारची सर्वात मोठी घळ आहे. अशी ही अद्भुत रूपे पाहिली की निसर्ग नावाच्या किमयागारापुढे आपण किती खुजे आहोत याची जाणीव त्याच्या केवळ दर्शनाने आपल्याला क्षणोक्षणी होत राहते.

घळीच्या सुरुवातीलाचा गार पाण्याचा एक जिवंत झरा आहे. जो उन्हाळ्यातही कधी आटत नाही. एक सोपा कातळटप्पा उतरुन आपण दरीच्या नळीत प्रवेश करतो.

दरीचे वाकडे तिकडे वळण एखाद्या सापासारखे लांबच लांब दिसते. दरीत प्रवेश केल्यावर तिचे ते रूप पाहून आपण चक्रावून जातो. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय अरुंद नाळ आहे. ही नळी दोन्ही बाजूला उभ्या तुटलेल्या काळ्याकभिन्न कातळकड्यांनी बंदिस्त झालेली. पहिला कातळ्टप्पा उतरताच एक लहानसा डोह आपला मार्ग अडवतो.

साधारण १.५ फूट खोल आणि १२/१३ फूट लांब त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून कौशल्याने पार व्हावे लागते. मग तीव्र उतार सुरु होतो. नाळ अधिकाधिक अरूंद होते. कुठेही सपाट मार्ग उरत नाही. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षरशः तिथे खच पडलेला दिसतो. मग आणखीन एक मोठा पाणसाठा मार्ग अडवतो.

एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी, तर दुसर्या बाजूला ३ फूट खोल पाणी. हेही पाणी कधी आटत नाही, कारण पाण्याच्या बाष्पीभवनाला सूर्यकिरण इकडे पोहोचूच देत नाहीत. अतिशय थंडगार त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार केवळ प्रत्यक्ष अनुभवावा घ्यावा असाच आहे. मग कधी येताय आमच्या सांदन दरी च्या भेटीला ?

सूचना: 1. सुरक्षित भटकंती करा व सोबतीला कुणाला तरी घ्या, 2. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नये, 3. ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा. व सोबत अत्यावश्यक साधन सामुग्री ठेवा, 4. ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरातील सदस्यांना सांगूनच जा, 5. पायवाटा माहिती नसल्यास स्थानिक वाटाड्या बरोबर ठेवा, 6. मळलेल्या पाऊलवाटांचा वापर करा, अनोळखी वाटेने जाण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका.

Leave a Comment

You cannot copy content of this page