आपला सह्याद्रीच्या कुशीत अनेक गड किल्ले आहेत. सह्याद्री हा अनेक विविध भौगोलिक गुणवैशिष्ट्यांनी ओळखला जातो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असलेले गड किल्ले आपल्या पराक्रमाने तर आपल्या खास वैशिष्ट्याने ओळखला जातो. असाच एक गड ज्या गडावर कोणतंच बांधकाम सध्यातरी दिसत नाहीयेत त्यामुळे शिवकाळात किंवा त्यापूर्वी याचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा.
गडाचा परिसर एक एकर पर्यंत पसरलेला असून. गडाच्या मध्यभागी चौथरा बांधलेला आहे. ठीक ठिकाणी बुरुजांचे अवशेष दिसतात या व्यतिरिक्त गडावर फारसं बांधकाम नसल्याने हा गड कोणी कधी कशाला बांधला याबाबत माहिती उपलब्ध नाही. तरी देखील या गडावर भेट देण्यासाठी महाराष्ट्राभरातून लोक येतात.
आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आले असतील की बांधकाम नाही मग लोक यावर भेट द्यायला का येतात. पण तात्पुरती हे ठिकाण कुठे आहे ते पाहू. हे ठिकाण आहे कमळगडावर.
महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट वरून खाली येणार्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोर्यात उतरले की, सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गाव येते. नंदावणे गावच्या मागे असलेल्या डोंगरावरून वरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर जाता येतं. वाई बस स्थानकातून देखील नंदावणे गावात येण्यासाठी बस आहेत.
कमळगड प्रसिद्ध आहे तो गेरूच्या विहीरी साठी. गेरूची(कावेची) विहिरी समुद्रसपाटी पासून ४२०० फूटावरील ऊंच आहे. ह्या विहारीला स्थानिक लोक गेरुची किंवा कावेची विहीर या नावाने ओळखतात. आता गेरू म्हणजे काव हा प्रकार आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल. गाव खेड्यात रांगोळी काढण्यापूर्वी मूली आणि महिला ज्या लालसर मातीने सारवून घेतात आणि त्यावर रांगोळी काढतात तोच हा काव आणि गेरू.
विहीर म्हटलं की गोल आकार जमिनी लगत असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. परंतु, कमळगडावरील ही विहीर आयताकृती आहे. या विहिरीत आत उतरायला कातळात खोदलेल्या घडीव पायऱ्या आहेत. ५०-६० पायऱ्या उतरत जाताना आपण जणु डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. विहिरीत उतरणारी वाट अतिशय अरुंद असल्याने आयताकृती वाट उतरत असताना थरारक अनुभव येतो.
या आयताकृती विहिरी ८० ते ९० फूट खोल कपारीत आहे. जस जसे आपण विहिरीच्या तळाशी जातो तसं तसं विहिरीतील वातावरण थंडगार होतं जातं. जणू आपण निसर्गनिर्मित फ्रीज मध्ये जात आहोत असा अनुभव येतो.
तळाशी पोहोचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते. पायऱ्या निसरड्या असल्याने उतरण्यासाठी पोलादी दोर बांधलेले आहेत.
ऊन वाऱ्याने त्यांना थोडं गंज पडला आहे पण त्यामानाने मजबूत आहेत. खाली गुहेत उतरल्यावर दोन खोली सदृश्य जागा असून त्यात पाणी झिरपते. पायऱ्यांच्या समोर उभा कातळ असून दोन बाजूला उंच मातीची भिंत आहे. गुहेत म्हणजे विहिरीत प्रकाश येण्यासाठी वर खिडकी किंवा मोकळी जागा आहे. जवळपास ८० ते ९० फुटांच्या अतिशय अरुंद कपारीत असलेल्या या अतिशय थंड विहिरी चा थरारक अनुभव प्रत्येकांनी घ्यायलाच हवा.