ठाणे जिल्ह्यामध्ये असणारे भूमिज शैलीतील प्राचीन शिव मंदिर

मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर पुरातन असे अंबरेश्वर शिव मंदिर स्थित आहे. हे मंदिर भूमिज शैलीचे सर्वात प्राचीन मंदिर असून महाराष्ट्रातील हेमाडपंथी मंदिरांमध्ये उत्कृष्ठ उदाहरण आहे.

या मंदिराचे बांधकाम   इ. स. १०६० मध्ये झाले असल्याचा उल्लेख मंदिर परिसरातील शिलालेखात आढळतो. श्रीमलंग डोंगराच्या पायथ्याशी उगम पावणार्याी वालधुनी नदीच्या काठावर या मंदिराचे बांधकाम करण्यात आले.

संपूर्ण मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात आहे. शिलाहार राजघराण्यातील छित्तराज राजा यांनी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे त्यांचे पुत्र महामण्डलेश्वर मम्वाणीराजा यांनी  इ. स. १०६० मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी केली.

आख्यायिका : पांडवांनी एक मोठा दगड कोरून एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. या मंदिर परिसरातील एका गुंफेतून मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर पांडव तिथून निघून गेले.

या मंदिराभोवतालची भिंत अणि समोरचा नंदीमंडप काळाच्या ओघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर अजून शाबूत आहे. सध्याचे मंदिर हे दोन भागात आहे, सभामंडप अणि गर्भगृह(गाभारा). सभागृह हे सर्व बाजूंनी बंद आहे.

मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले घूमटाकृती छत आहे. मूळच्या अठरा खांबांपैकी चार खांब स्पष्ट पणे दिसतात, बाकीच्या खांबांचे अस्तित्व फारसे जाणवत नाही.

पाण्यात दगड मारल्यावर निर्माण होणार्याी तरंगांप्रमाणे छताची शिल्पकला छताचे सौंदर्य वाढते. मंडपाच्या खांबांवर शंकर पार्वती च्या विविध मुद्रेतील कोरीव अश्या मूर्ती साकारलेल्या आढळतात.

गर्भगृहाची बांधणी ही सभामंडपापासून थोडी खोलवर करण्यात आलेली आहे. गाभाऱ्यात जाण्यासाठी २० पायर्याा उतरून जावे लागते. गर्भगृहाच्या मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे.

हे शिवमंदिर सप्तांग भूमिज पद्धतीत मोडते. म्हणजेच या मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. एकावर एक असे सात भूमी(शिल्प रांग) रचण्यात आले होते.

परंतु कालांतराने गाभार्याोवरील शिखर नष्ट झाल्यामुळे तीनच भूमी (शिल्प रांग) शिल्लक आहेत. नष्ट झालेल्या वास्तूचे अवशेष मंदिराच्या परिसरात पाहावयास मिळतात. मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत, त्यापैकी मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर सुंदर अशी नंदीची भलीमोठी पाषाणरुपी मूर्ती नजरेस पडते.

मंदिराच्या बाह्यांगाला चारही बाजूस आखीव रेखीव अश्या सुबक देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने उजव्या सोंडेचा गणपती, शंकर पार्वती, लक्ष्मी, विष्णु, शिवपार्वती विवाह सोहळा, देवी महाकाली अश्या सर्व मूर्तींचा समावेश आहे. मंदिराच्या भिंतींवर अनेक हत्तींचे ही शिल्प कोरलेले आहेत.

जणु काही अनेक हत्तींच्या पाठीवरच या मंदिराचा डोलारा उभा आहे. संपूर्ण मंदिराचे बांधकाम हे काळ्या पाषाणात करण्यात आल्यामुळे सभोवतालच्या वातावरणात थोड्या प्रमाणात गारवा जाणवतो.

महाशिवरात्रीला येथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी मंदिरात भक्तांची गर्दी असते. असे हे महादेवाचे पुरातन मंदिर प्राचीन भारतीय संस्कृतीचे, स्थापत्यशास्त्राचे वर्णन करणारे उत्कृष्ठ उदाहरण आहे.

लेखन – सुचिता घाडगे, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page