shivraay ase shaktidata

शिवराय असे शक्तीदाता दुसऱ्या महायुद्धातील एका लढाई ची कहाणी

Shivaji Maharaj

सह्याद्री च्या कुशीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी बांधलेले गडकोट म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय जणू जीव कि प्राण. शिवराय तर साक्षात महादेवाचे रूप घेऊनच आले प्रसंगी रुद्रावतार दाखवणारे तर कधी प्रेमळ आणि मायाळू.

आजही शिवाजी महाराजांच्या नावाची जादू ओसरली नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने कित्येक मुघली सरदारांना घाम फुटायचा. ज्या औरंगजेबाला दक्खन काबीज करायचा होता त्या औरंग्याला शेवटी इथल्या मातीत गाडलं. त्याच्या सोबत लढण्याची ताकत आली कशी?? ती ताकद ती छत्रपती शिवाजी महाराज या जादुई मंत्राने शिवराय असे शक्तीदाता! आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपसूक मुठी वळल्या जातात.

शिवराय असे शक्तीदाता !! याची प्रचिती खुद्द इंग्रजांनी सुद्धा घेतली होती कधी ते आज आपण पाहुयात. सह्याद्री च्या कुशीतील महाराष्ट्रच्या कणखर,राकट आणि चिवट भूमी मधल्या रांगड्या आणि शूरवीर चपळ सैनिकांना घेऊन ब्रिटिश सरकार ने १७६८ साली लाईट इन्फन्ट्री रेजिमेंट(बॉंबे सिपॉय) ची स्थापना केली.

हि रेजिमेंट देशातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. प्रत्येक सैनिक आपल्या रेजिमेंट साठी प्राणांची बाजी लावून लढत असतो. त्याच बरोबर प्रत्येक रेजिमेंट चा स्वतःचा असा खास असा एक गौरवशाली इतिहास असतो, त्यांच्या काही परंपरा असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने सरदार तानाजी मालुसरेंच्या नेतृत्वाखाली कोंढण्याची लढाई झाली. आणि एका रात्रीत मराठ्यांनी कोंढाणा जिंकला, या लढाईची प्रेरणा घेऊन ‘मराठा लाईट इंफंट्री’ ची स्थापना झाली.

या रेजिमेंट चे घोषवाक्य आहे, ‘बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय’. प्रत्येक रेजिमेंट ची युध्द घोषणा असते ज्याला Battle Cry म्हणतात. ही युद्ध घोषणा शक्यतो देव देवीच्या जय जयकाराची घोषणा असते. जेणेकरून सैनिक त्वेषाने लढू शकेल. परंतु “बोल श्री छत्रपती महाराज कि जय” अशी एखाद्या व्यक्तीच्या नावाने दिली जाणारी घोषणा जगाच्यापाठीवर बहुदा पहिलीच असेल.

या युद्ध घोषणेचा देखील रंजक इतिहास आहे. या गर्जना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांवेळी मराठा सैनिकांनी ब्रिटिश नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात जगभर दिल्या होत्या. पहिल्या महायुद्धाचा शेवट हा ‘Battle of Sharqat’ च्या लढाई ने झाला. ही लढाई जगभरातल्या सैन्य लढ्यातील सर्वात प्रसिद्ध आणि पहिल्या महायुद्धाला संपावणारी अशी विजयी घटना म्हणून गणली जाते.

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी जेंव्हा ब्रिटिश आणि इटालियन सैनिक १९४१ साली आमनेसामने आले. ईशान्य आफ्रिकेत इथोपिया सुदान यांच्या जवळ एरिट्रीया नावाचा देश आहे. या प्रांतात डोलोगोलो नावाचा एक डोंगरी किल्ला त्यावेळी इटालियन आर्मी च्या ताब्यात होता. आणि किल्ल्याच्या जोरावर इटली चा त्या भागावर कब्जा होता.

त्यामुळे साहजिकच लाल समुद्राच्या आखाती प्रदेशावर इटालियन सैनिकांच वर्चस्व होतं. त्यामुळे ब्रिटिशांना तो किल्ल्या घेणं आवश्यक होते. डोलोगोलो चा किल्ला समुद्र सपाटी पासून अडीच हजार फूट उंच होता. या किल्ल्याच महत्व ओळखून च इटालियन सैनिकांनी किल्ल्यावर भरपूर प्रमाणात रसद आणि दारुगोळा किल्ल्यावर आणून ठेवला. त्या मुळे किल्ला काही केल्या दाद देत नव्हता.

ब्रिटिशांनी पंजाब आणि कुमाऊं रेजिमेंट ला किल्ला ताब्यात घेण्यासाठी बोलावलं पण किल्ला काही दाद देत नव्हता. कित्येक ब्रिटिश सैनिकांना हा किल्ला घेताना वीर मरण आलं.

कुमाऊं रेजिमेंट ला मदत करण्यासाठी मराठा लाईट इन्फ्रन्ट्री ला पाठवण्यात आलं. जानेवारी १९४१ च्या शेवटी ५वी मराठा लाईट इन्फ्रन्ट्री तिथे पोहोचली. सुभेदार श्रीरंग लावण यांच्याकडे या इन्फ्रन्ट्री च नेतृत्व होतं. पहिल्या चढाईत या तुकडीला ही अपयश आलं होतं. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी ब्रिटिशाकडून दबाव वाढत होता.

या मोहिमेची जबाबदारी होती फ्रॅंक मेजरवायर या ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे. सह्याद्री सदृश्य किल्ल्या असल्याने सुभेदार श्रीरंग लावण यांनी फ्रँक ला विचारलं हा किल्ला माझी रेजिमेंट घेऊ शकते जर तुम्ही बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्ध घोषणा बोलण्याची परवानगी दिली तर. फ्रँक कुत्सित पणे लावण यांच्या वर हसला पण लावण यांचा आत्मविश्वास बघता फ्रॅंक याने लावण आणि त्यांच्या बटालियन ला संधी दिली. 

श्रीरंग लावण यांनी पाहणी करून त्यांच्या सैनिकासह कड्यावरून चढत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने सरसर करत किल्ल्यावर गेले. इटालियन सैनिकांनी वर चढणाऱ्या सैनिकांवर बंदूक आणि तोफेचा मारा केला पण हे लढवय्ये त्वेषाने चढत होते.

किल्ल्यावर पोहोचल्यावर घनघोर युद्ध झालं आणि किल्ला मराठा लाईट इन्फ्रन्ट्री च्या बटालियन ने मिळवला. सुभेदार श्रीरंग लावण यांचा पराक्रम पाहून फ्रँक यांनी बोटं तोंडात घातली. सुभेदार श्रीरंग लावण यांना १८ जुलै १९४१ रोजी मिलीटरी क्रॉस पदकांने सन्मानित करण्यात आले आणि त्या दिवसापासून मराठा लाईट इन्फ्रन्ट्री ची घोषणा “बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय”

छत्रपतींच्या केवळ नावाने सैनिकामध्ये स्फुरण चढून ते असामान्य पराक्रम गाजवतात हे त्यावेळी सिद्ध झालं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा प्रत्येक युद्धच्या वेळी मराठ्यांनी रणमैदान गाजवून सोडलं होतं. आजही ती उज्ज्वल परंपरा चालू आहे. म्हणूनच मराठा सैनिकांचा केवळ भारतातच नव्हे तर जगभर दरारा अन आदर आहे.

1 thought on “शिवराय असे शक्तीदाता दुसऱ्या महायुद्धातील एका लढाई ची कहाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *