सिंधुदुर्ग हा जलदुर्गांमधील सर्वात मोठा आणि आकर्षक किल्ला आहे. या जिल्ह्याला याच जलदुर्गावरून नाव पडले. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणता तीन किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला लागतो.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कल्पनेतून या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. सागर किनाऱ्यावरील पाश्चारत्त्य व्यापारी तसेच दर्यावर्दी पश्चिम किनारपट्टी काबीज करण्याच्या प्रयत्नात होती. या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती झाली.
10 नोव्हेंबर 1664 ला मालवणमधील कुरटे नावाच्या बेटावर 44 एकर क्षेत्रावर सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी करण्यात आली. या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांनी 1689 ते 1700 दरम्यान बांधलेले देशातील एकमेव असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात शिवबांची सुंदर मूर्ती वीरासनात बसलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ या किल्ल्याच्या बांधणीने रोवली. हा किल्ला बांधण्यासाठी 500 पाथरवट, 200 लोहार, तीन हजार मजूर आणि शेकडो कुशल कारागीर होते, असा उल्लेख या गडावरील शिलालेखावर आढळतो.
किल्ल्याच्या तटाला बळकटी आणण्यासाठी 52 भक्कम बुरुज बांधले. महादरवाजातून आता आल्यानंतर उजव्या बाजूला तटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे दिसतात.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बरोबर मध्यावर महादेवाचे पुरातन असे मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे की तिच्या पुढ्यात एक चौकोनी विहिर आहे.
या गडाचे सर्वात मोठे आश्चर्य असे की गडाला चहूबाजूंनी समुद्राने वेढले असले तरीही या गडाच्या विहिरीमध्ये असलेले पाणी अतिशय गोड आहे. या गडावर दूधबाव, साखरबाव, दहीबाव अशा अनेक शिवकालीन विहिरी आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत या गडावर एकही हल्ला झाला नाही, अशी इतिहासामध्ये नोंद आहे. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तीमध्ये विजापूरकरांनी या गडावर स्वारी केली. त्यानंतर इसवीसन 1765 मध्ये मेजर गार्डन व कॅप्टन कॉटसन यांनी हा किल्ला काबीज केला.
किल्ल्यावरील दारू गोळ्यांचे कोठार पेटले व किल्ला इंग्रजांच्या हातात गेला. पुढे 1766 मध्ये तह झाला आणि पुन्हा किल्ला मराठ्यांकडे आला. शेवटी मराठेशाहीच्या अस्तकाळी हा किल्ला इंग्रजांकडे कायमचा गेला. या किल्ल्याचा महिमा सांगताना “चौर्यां शी बंदरी ऐसी जागा नाही” असा उल्लेख केला जातो. निसर्ग सौंदर्याने नटलेला असा हा सिंधुदुर्ग अगदी मनात घर करून जातो.