छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन

छत्रपती  महाराजांना जसे अनेक स्वामिनिष्ठ मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि प्रादेशिक घटकांचेही सहकार्य मिळाले. किंबहुना या भौगोलिक प्रदेशांचा योग्य वापर त्यांनी स्वराज्यासाठी विकासात उपयोग करून घेतला. जलव्यवस्थापन दुष्काळ निर्मूलन याला शिवाजी महाराजांचे प्रथम प्राधान्य दिले.

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर अनेक गडकिल्ले मोठ्या दिमाखात उभे आहेत. त्यातील काही सातवाहन, शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या सह्याद्री पर्वताच्या आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे सह्याद्री आणि गडावर त्यांचे विशेष प्रेम.

छत्रपती शिवाजी महाराज दुर्गबांधणी करताना त्यांनी प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला दिलं. रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी गडाची आवश्यक बांधणी असेल तर आधी खडक फोडून त्या ठिकाणी तळी, पाण्याचे मोठं मोठे टाके बांधावे जेणेकरून पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल.

गडावर जिवंत पाण्याचे झरे असतील ते शोधावे त्याचा वापर करावा. त्या झऱ्यांचा वापर करून तळी बांधावी त्या तळ्यातील गाळ वेळो वेळी उपसून पाणी स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितक्यावरच निश्चिंती न राहता इतर ठिकाणी देखील पर्यायी तळी किंवा टाके बांधून काढावे जर पाण्याचे झरे हल्ला मुळे किंवा इतर कारणाने बंद झाले तर पर्यायी तळ्या टाक्यांचा वापर केला जाऊ शकतो.

पाणी बिनकामी खर्च होऊ न द्यावे, गडाचे पाणी बहुत जतन करून टिकवावे. गड व पाण्याच्या देखभालीसाठी लोकं कामी ठेवावी. यासाठी त्यांना आवश्यक असलेली अवजारे हत्यारे द्यावी. गडावरील शिबंदीला वर्षभर पाणी कसे पुरेल याचे नियोजन चोख आणि काळजीपूर्वक त्यांनी अत्यंत दूरदृष्टीने करून ठेवले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापनाचा आणि दूरदृष्टी चा अभ्यास करण्यासाठी स्वराज्याची राजधानी रायगड जरूर बघावा. रायगडावरील डोंगराच्या पोटात खोदलेली टाकी, तळी पाहिल्यावर लक्षात येते की रायगड हा प्राचीन गड असून त्याला निश्चितच प्राचीन इतिहास लाभला आहे.

अर्थात पूर्वी त्याचे नाव रायरी होते. शिलाहार राजांपासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेक राजवटी रायरी किल्ल्यावर नांदल्या आहेत. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव केल्यावर रायरी ६ एप्रिल १६५६ साली वेढा घालून जिंकला आणि स्वराज्यात दाखल झाला.

शिवाजी महाराज जातीने रायगडावर आल्यावर सरळसोट भिंतीसारखे चहूबाजूने तुटलेले उभे कडे, दीड गाव उंच आणि वर चौरंगासारखा दीड मैल लांब आणि १ मैल रुंद सपाट माथा पाहिल्यावर ‘तख्तास हाच जागा करावा’ असे त्यांच्या मनात आले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची पुनर्बांधणी केली.

रायगडाच्या पुनर्बांधणी करताना लागणारे दगड चिरे त्यांनी रायरी च्या डोंगरा फोडून जमा केले. आणि खणलेल्या जागी मोठं मोठी तलाव बांधून रायगडावर मुबलक पाणीसाठा उपलब्ध करुन दिला. गंगासागर तलाव, कोळीम तलाव, कुशावर्त तलाव, हत्ती तलाव, काळा तलाव आणि सध्या वापरात नसललेले तीन तलाव धरून एकूण आठ तलाव रायगडावर आहेत.

त्यातील राजवाड्याच्या समोर बांधलेला गंगासागर तलाव हा सर्वात मोठा जलसाठा असलेला तलाव. या तलावांच्या सोबतच गडावर जवळ जवळ पाऊणशे पाण्याची टाकी आहेत. शिवराज्यभिषेकाला रायगडावर एक लाखाहून अधिक पाहुणे आले होते.

या महान समारंभातील सर्व लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान गडावरील या पाणवठ्यांनी भागवली तरी सुद्धा पाण्यावर मुबलक पाणी साठा शिल्लक होता. रायगडावर सर्वांना मुबलक पाणी पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले, त्याचा पुरावा रायगडावरच पाहायला मिळतो.

कित्येक जलदुर्ग पाहताना देखील जलव्यवस्थापन किती दांडग आहे हे दिसून येतं. भोवताली खारंपाणी असून देखील गडावरील विहिरी तलावात गोड पाणी आजही आढळुन येत.

दुष्काळी परिस्थितीत अगदी काल परवा पर्यंत गावात पाणी पुरवठा हा गडावरून होत असल्याचं कित्येक गावकऱ्यांनी सांगितलं आहे.  छोट्या छोट्या ओढे-नाल्यांवर किंवा नद्यांवर लहान लहान बंधारे घालून त्यातील पाणी पाटांनी शेतीसाठी पुरवले जात असे. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन किती भविष्याचा विचार करणारे होते हे दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड च्या पायथ्याशी राजमाता जिजाऊसाठी पाचाडला वाडा बांधला. या वाड्यात दोन विहिरी आहेत. विशेष म्हणजे एकीला खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या असून वर मजबूत दगडी बांधकाम केलं आहे. त्यावर दगडीबैठक आहे या विहिरीला ‘तक्क्याची विहीर’ म्हणतात. महाराजांनी जिजाऊंना बसण्यासाठी तर कधी स्वतः प्रजेशी संवाद साधण्यासाठी ती खास बनवून घेतली. एका मराठमोळ्या राजाची जीवन आणि जिव्हाळा जपणारी साधीसुधी मराठमोळी विहीर कित्येक शिवप्रसंगांची साक्षीदार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page