मराठ्यांच्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर मराठयांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची साक्ष ही वेळोवेळी दिसून येते. त्यापैकी एक साल्हेरची लढाई ही मराठयांच्या अभिमानाची आणि प्रतिष्ठेची दिसून येते कारण इतर लढाई पेक्षा वेगळेपण म्हणजे मैदानावर समोरासमोर लढाई करून ही लढाई जिंकली.
या युद्धात मराठ्यांनी दाखवलेल्या युद्ध कौशल्याची कीर्ती पाहून मराठ्यांची ताकद आणि दरारा कैक पटींनी वाढला होता. साल्हेर किल्ला जिंकून लगेचच मुल्हेर आणि त्यानंतर बागलाण प्रांत जिंकून मराठ्यांचा दबदबा सुरत पर्यंत पोहोचला होता.
सप्टेंबर १६६६ मध्ये आग्र्याहून सुटका झाल्यावर स्वराज्याची घडी पूर्ववत करण्यासाठी शिवाजीमहाराजांनी एकेक गड किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. १६७१ साली शिवाजी महाराजांनी बागलाण ची मोहीम आखली. त्याकाळी बागलाण प्रांतात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भुभाग गुजरात मधील सुरत पर्यंत चा भाग समाविष्ट होता.
बागलाण प्रांतातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे साल्हेर आणि मुल्हेर चा किल्ला. बागलाण च्या मोहिमेदरम्यान साल्हेर किल्ला स्वराज्यात आला होता. साल्हेर वर पुन्हा पकड मिळवण्यासाठी आणि मराठ्यांचा खात्मा करण्यासाठी औरंगजेबाने महाबतखान या महापराक्रमी आणि मातब्बर सरदाराला मुद्दामहुन दक्षिणेच्या मोहिमेवर पाठविले होते.
महाबत खानाने प्रयत्न केले पण त्यांना हा किल्ला काही मिळवता आला नाही. साल्हेरचा माथा हा चारही बाजूने उंच कातळकड्यांनी वेढलेला असल्यामुळे या किल्ल्याची चढाई तशी अवघड होती. त्यामुळे महाबत खानाने किल्ला मिळवण्यासाठी फारसे प्रयत्न नाही केले ही बातमी औरंगजेब यांस कळाली.
म्हणून रागाने लाल झालेल्या औरंगजेब ने महाबत खानाला खडे बोल सूनवत पुन्हा बोलावले आणि मोहिमेची जबाबदारी आपला दूध भाऊ बहादूर कोकलताश याला दिली.
बहादूरखानाने बादशहाचे समाधान करताना, ’तुम्ही दिल्लीची पातशाही खुशाल करणे आपण शिवाजीवर जातो त्यास हालखुद ठेवितो, त्याचे लष्कर पातशाही मुलखात न येईल असे करितो. पातशाहांनी फ़िकीर न करावी.’ अशा आशयाचे उदगार काढले यासंदर्भातील नोंद सभासद बखरीत आढळते.
बहादूर खानाने साल्हेर वर येताच साल्हेर च्या चारही बाजुंनी वेढा घातला. वेढ्याचा फासा आवळून त्याने चढाईला सुरुवात केली. बहादुरखानाचा विश्वासू सरदार इखलासखान याने मराठ्यांची अक्षरशः दाणादाण उडवली. मुघलांची फ़ौज पाहता मराठे यांना तोंड कसं देणार हा प्रश्न होता. शिवाजी महाराजांनी या वेढ्याला फोडण्यासाठी सरसेनापती प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांची निवड केली.
योजने प्रमाणे सरसेनापती वरघाटाकडून येणार होते तर मोरोपंत पिंगळे कोकणातून येऊन साल्हेर ला येणार होते. दोन्हीही बाजुंनी एकत्र पणे हल्ला केल्याने मराठयांनी मुघलांची दाणादाण उडवली. कोकलताश याने विश्वासू आणि पराक्रमी इखलासखान मियाना, बहलोलखान, अमरसिंग, त्याचा मुलगा मुहकमसिंग अश्या मातब्बर सरदारांची निवड केली होती.
हे सर्व सरदार जिवाच्या आकांताने लढत होते सपासप वार करत मराठ्यांना कापून काढत होते. तर मराठ्यांच्या बाजूने खुद्द सरसेनापती प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव मोहीते, व्यंकाजी दत्ता, रुपाजी भोसले, सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप व गोदोजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ असे मातब्बर सरदार प्राणपणाने लढत होते.
मुघल सैनिक पहिल्यांदा मराठ्यांना इतकं त्वेषाने लढताना पाहत होते. एरवी गनिमी कावा करणारे मराठे ज्या पद्धतीने आणि ज्या त्वेषाने लढत होते हे पाहून बहुतेक मुघल सैनिकांची भीतीने गाळण उडाली. जागा मिळेल तिथे ते जिवाच्या भीतीने लपून बसले. अखेर विजयश्री प्रसन्न झाली मराठ्यांनी कर्तृत्वाने ही क्रांतिकारक लढाई ५ जानेवारी १६७१रोजी जिंकली. या लढाई मध्ये मराठयांच्या पराक्रमाची शर्थ करताना.
सूर्यराव काकडे यांना वीर मरण आलं. सूर्यराव यांचा पराक्रम पाहून ” महाभारती जैसा कर्ण योद्धा त्या प्रतिमेचा शूर पडला” अशी नोंद सभासद बखरीमध्ये आढळते.
पुढे जाऊन त्यांनी असं लिहिलं बादशहाच्या जिव्हारी लागला इतका की पातशहा असे कष्टी जाले.’खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून सिवाजीसच दिधली असे वाटते. आता सिवाजी अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे. आता सिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही. असे सभासदांनी लिहून ठेवले म्हणजे या लढाईच महत्त्व कित्ती होतं ते दिसून येतं.