सात बेटांच्या शहराचा मुंबई आणि उपनगराचा आश्चर्यकारक इतिहास

मुंबईच्या इतिहासावर दृष्टीक्षेप टाकला तर बॉम्बे सिटी गझेट प्रमाणे ख्रिस्तोत्तर १३०० मध्ये शिलाहार राजवटीतील बिंब नावाचा राजा प्रसिद्ध झाला. त्याने महिकावती (माहीम) शहर वसवले व किल्ला बांधून राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता ‘प्रभादेवी’ (नायगाव) ही होती. लोक सुखी होते.

जमीन, महसूल, न्याय वगैरे च्या बाबतीत तो न्यायी व आदर्श होता. त्यानंतर या बेटावर गुजरात च्या मुबारकशहाने प्रथम सन १३२३ साली स्वारी करून साष्टी जिंकली. पुन्हा इ.स. १३४७ मध्ये नागरदेव हा साष्टीवर राज्य करू लागला. नंतर मरोळ जवळील प्रतापपूर व वसई येथे निकामालिक याचे लष्करी तळ होते. याच्याच कारकिर्दीत भोगले सरदार (भंडारी) यांचे बंड झाले. अशी घडामोड सतत चालू होती.

सन १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजशाही कमकुवत झाली आहे हे लक्षात घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला.  तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अति उत्साहाने येथील एत्तदेशीय लोकांना अनेक प्रकारांनी छळले.

अनेक देवळे भ्रष्ट केली. वंद्रापासून वसई पर्यंत अनेकांचे ख्रिस्तीकरण झाले होते.  पोर्तुगीजांपासून १८ फेब्रुवारी १६६५ मध्ये इंग्रजांचा सेनापती ‘हम्प्रे कुक’ याने साष्टी बेटे मिळवली.त्यामुळे मुंबई चे गोवा झाले नाही. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा मुत्सद्दी पणाने राजकारण करण्याकडे विशेष दृष्टीकोन होता.

पाण्याने वेढलेली बेटे एकमेकांना जोडली जाऊ लागली आणि मुंबई नावाच्या महानगरीचा जन्म झाला. ही बेटे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी समु्दात भर घातली, नवे रस्ते उभारले. या रस्तांचे अचूक मोजमाप करून जागोजागी मैलाचे दगड बसवण्यात आले.

या मोजमापासाठी गोऱ्या सायबाने हॉनिर्मन सर्कलजवळचे संट थॉमस चर्च हा शून्य मैल मानला आणि त्यापुढील प्रत्येक दगडावर या चर्चपासून किती मैल हे अंतर नोंदवले.

महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई हे नगर सात बेटांनी बनलेले आहे. पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती. या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले, ज्यापरत्वे आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.

मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे होती – माहीम (Mahim), वरळी (Worli), परळ (Parel), माझगाव (Mazgaon), मुंबई (Bombay), कुलाबा (Calaba), छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट – Old Woman’s Island). या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती.

ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.

मुंबई नजीक असलेल्या उपनगरांची माहिती देखील तेवढीच रोचक आहे. दादर, मुंबई बेटाच्या उत्तरेला वसलेले गाव. गाव ओलांडल्यानंतर थोडा चढ चढून मुंबईत येता येत असे, म्हणून चढाच्या या भागाला नाव पडलं, वरचा मजला गाठण्याचा जिना म्हणजे दादर. कोकणातील बोली भाषेत जिन्याला दादर च म्हणतात.

माटुंगा, मातंग स्थान म्हणजे हत्ती ठेवण्याचे ठिकाण! यावरून नाव आलं, असं म्हणतात की, या ठिकाणी भीमदेव राजाचे हत्ती ठेवले जात असत. भायखळा, ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते आणि त्याच्या मालकाचे नाव होते भाया; भायाचे खळे ते भायखळे, आणि त्याचा झाला भायखळा.

परळ, या ठिकाणी पुष्कळ परळीची झाडे होती म्हणून या गावाला नाव पडले. नायगाव, हे नाव ‘न्याय-ग्राम’ या शब्दावरून आलेले आहे या ठिकाणी राजा भीमदेवाचे न्यायालय आणि राजवाडा होता. न्याय मिळण्याचे ठिकाण – न्याय आणि ग्रामचा अपभ्रंश नायगाव.

चर्णी रोड, या भागात पुष्कळ गवत होते आणि गाई-म्हशी इथे चरत असत. बोरीबंदर, हे नाव १८५२ साली तेथपर्यंत असलेले समुद्रावरील बंदर आणि त्याच्या आजूबाजूला असलेली बोरींची झाडे यावरून पडले.

नळबाजार,शहरातील सांडपाण्याचे मुख्य गटार जिथून वाहत जाऊन वरळीच्या समुद्राला मिळत होते, तो भाग नळबाजार म्हटला जाऊ लागला. आता नळबाजार कुठे आणि वरळी कुठे? पण त्या काळात हे दोन्ही भाग या गटाराच्या नळाने एकमेकांना जोडलेले होते.

अँटॉप हिल, ही जागा अंतोबा नावाच्या कोळी बांधवांची होती यावर कुणाचा विश्वास बसेल काय? सायबाने अंतोबा यांचं नावाचा अपभ्रंश करून अँटॉप केला आणि त्यावरून नाव रूढ झालं, अँटॉप हिल डोंगरी, हा भाग तेव्हा संपूर्ण डोंगराळ होता.

कांदेवाडी, गिरगावातील कांदेवाडी हे नाव तेथल्या कांद्याच्या गोदामांनी आणले. लोहार चाळ, हे नाव तेथे असणाऱ्या लोखंडी सामानाच्या केवळ एका दुकानावरून पडले.

मुंबईतल्या सुमारे पंधरा रस्त्यांना मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरांची नावे दिलेली आहेत. उदा: लॅमिंग्टन रोड, आर्थर रोड, नेपियन सी रोड, सँडहर्स्ट रोड, ग्रँट रोड, हॉर्नबी रोड, रे रोड, कुलाब्याचा वुड हाऊस रोड वगैरे.

Leave a Comment

You cannot copy content of this page