सर्वप्रथम अवकाशात जाणाऱ्या श्वानाचं पुढे काय झालं?

अंतराळयात्री वा अंतराळवीर हा अंतराळयान चालवणारा किंवा त्यामधून अवकाशप्रवास करणारा मनुष्य आहे. अंतराळवीर किंवा कॉसमोनॉट ही एक मनुष्य अंतराळयंत्र प्रोग्रामद्वारे प्रशिक्षित केलेली व्यक्ती आहे ज्याला अंतराळ यानाचे कमांड, पायलट किंवा क्रू मेंबर म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते.

परंतु तुम्हला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की अंतराळात प्रथम मनुष्य नाही तर एक श्वान मादीने प्रवास केला. होय हे खरं आहे.! अवकाशात जाणारा पहिला सजीव प्राणी माणूस नसून ‘लायका’ नावाची रशियन श्वान मादी (कुत्री) आहे.

१९५७ साली ‘स्पुटनिक’ नावाच्या अवकाशयानातून तिला पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवण्यात आलं होतं. रशियन अंतराळ संशोधन केंद्र मॉस्को येथे रस्त्यावर भटकणाऱ्या श्वानांचा अभ्यास करण्यात आला.

भटके श्वानच का तर भूक, थंडी आणि गर्मी अश्या तिन्हींचा सामना करणारे श्वानच यासाठी निवडले जाणार होते. यासाठी बऱ्याच श्वानांवर अभ्यास झाला त्याचं प्रशिक्षण देखील सुरू झालं. त्यांना अतिशय बंदिस्त जागेत ठेऊन त्याच्यावर अभ्यास करण्यात आला. त्यांना प्रोटीन युक्त आहार देण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तीन श्वानांची निवड करण्यात आली.

लायका ही मॉस्कोच्या रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या श्वानांपैकी एक. जिची निवड अंतराळ प्रवासासाठी करण्यात आली. मादी श्वान निवडण्याचं कारण म्हणजे मादी आकाराने लहान आणि कमी आक्रमक असते.

प्रत्यक्ष प्रवासाला जाण्यापूर्वी प्रशिक्षणाचा एक भाग म्हणुन तिला अनेकदा हवेच्या उच्च दाबाखाली असलेल्या पेटीत ठेवलं गेलं. तिच्यावरील केलेल्या अभ्यास अन प्रशिक्षणाचे सर्व निकष पूर्ण झाल्यावर तिला अवकाशात झेपावण्यासाठी तयार केलं. ३ नोव्हेंबर १९५७ रोजी पहाटे ५:३० वाजता रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानाने लायकाला आपल्या कवेत घेऊन अवकाशात झेप घेतली.

लायकाच्या दुर्दैवानं इतकं होतं की हा प्रवास एकेरी होता, ती पुन्हा पृथीवर येणार नव्हती. तिच्या सोबत केवळ एक वेळ पुरेल इतकंच अन्न पाणी होतं. आणि १ आठवडा पुरेल इतकाच ऑक्सिजन दिला गेला होता.

त्या वेळच्या नोंदीनुसार यान हवेत झेप घेत असताना गुरुत्वाकर्षणाची पातळी पृथ्वीपेक्षा पाच पटीने जास्त होती. साहजिकच लायका खुप घाबरून गेली असेल कारण तिच्या शरीराला जोडलेल्या संवेदकानी तिच्या नेहमीपेक्षा तिप्पट वेगाने चालणाऱ्या श्वासाची आणि चौपट वेगाने धडकणाऱ्या हृदयाची नोंद केली.

लायकाचा मृत्यू हवेच्या कमतरतेमुळं आणि विनायातना होईल असा संशोधकांचा अंदाज होता. आणि अंतराळात पोहोचल्यावरही लायका काही दिवस जिवंत होती आणि तिचा मृत्यु त्यांच्या अंदाजाप्रमाणेच झाला हा त्यांचा दावा होता.

परंतु हा दावा सपशेल खोटा ठरला. कारण १९९३ साली ओलेग गोझेंको या रशियन डॉक्टर आणि श्वान प्रशिक्षकाने खऱ्या माहितीचा उलगडा केला. “पृथ्वीच्या कक्षेबाहेर पोचल्यावर काही वेळातच यानाचं उष्णतानिरोधक कवच निकामी झालं आणि अंतर्भागातील तापमान ९० डिग्रीपर्यंत वाढलं आणि मग ते वाढतच गेलं. त्यानंतर काही मिनिटांनी अति उष्णतेने लायकाचा मृत्यू झाला.

प्रशिक्षणादरम्यान तिचं नाव कुदऱ्याव्हका असं ठेवण्यात आलं होतं पण सोव्हिएट रेडिओवरुन लोकांना तिची ओळख करून दिली जात असताना लोकांनी तिचं भुंकणं ऐकलं. तेव्हापासून ती लायका या नावानं लोकप्रिय झाली.

“लायका” या रशियन शब्दाचा अर्थ “भुंकणारा/री” असा होतो. त्यानंतर देखील बरेच प्रयोग झाले ज्यात पुन्हा श्वान व माकड यांना अंतराळात पाठवलं. अवकाशात जाण्यापूर्वी त्यांची मानसिकता हृदयावर होणारे परिणाम, रक्ताभिसरण, शरीरात होणारे बदल आद्रतेच प्रमाण, चयापचय क्रिया असे शेकडो प्रयोग केले गेले.

Leave a Comment

You cannot copy content of this page