प्राचीन हमरस्त्यांचा राजा असलेल्या या घाटाला नाणेघाट असे नाव पडले?

सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला.

इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. नाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यांनी बनलेली आहे.

मौर्य राजा नंतर सत्तेत आलेल्या  सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागणिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे.

इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे. सातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होते.

कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता. घाट चढल्यावर घाटघर लागते. घाटाची चढण प्रधान पाड्यापासून वैशाखऱ्याजवळ सुरू होते. ती घनदाट वनस्पतींच्या भागातून सुमारे साडेचार किलोमीटर अंतर कापून घाटघरजवळ शिंगरू पठारावर येऊन संपते.

चढणीच्या शेवटच्या टप्प्यात एकशेतीस फूट लांबीची प्रस्तर घळ असून तिला ‘घाटाची नळी’ असे म्हटले जाते. तो सबंध प्रस्तर खोदून त्यातून वाट काढण्यात आली आहे. त्या वेळच्या कामगारांनी हे काम व स्थापत्य कसं केलं असेल याच नवलच आहे.

आजच्या घडीलाच हे स्थापत्य इतकं अवघड वाटत तर त्या काळात नक्कीच अवघड आव्हान असावे. सातवाहनांनी तो घाट वैशाखरेपासून घाटघर व पुढे जुन्नरपर्यंत कातळ फोडून, त्यात पायर्यांची सोय करून बांधलेला होता. त्या पायऱ्यांचे अवशेष आजही पाहण्यास मिळतात.

घाटात अनेक सोयी पुरवण्यात आल्याचे दिसून येते. शिंगरू पठार व पुलुसो नाळ्याजवळ गणेशथाळ येथे दगडात रांजण खोदलेले आहेत. स्थानिक लोक त्या रांजणांना ‘जकातीचे रांजण’ असे म्हणतात.

याला जकातीचे रांजण का म्हणतात या बाबतीत ठाम पणे सांगता येत नाही काही इतिहासकारांच्या मते लमाण व्यापार्यांकडून घाटाचा वापर केल्याबद्दलचे शुल्क किंवा कर रांजणात टाकत म्हणून त्यास जकातीचे रांजण म्हणत असावे किंवा या रंजणांची व्यवस्था पांथस्थांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणूनही असेल.

घाटघरजवळ छोटे तलावही खोदलेले आहेत. त्याचाच अर्थ प्रवासी, लमाणांचे तांडे व त्यांच्या जनावरांसाठी पाणीपुरवठा करण्याचीही सोय असावी. घाटघर व आजुबाजूचे रांजण हे नेहमीप्रमाणे उभट गोलाकार आहेत.

मात्र गणेशथाळजवळील रांजण आकाराने चौकोनी आहे. यामुळे हे सर्व रांजण जकातीसाठी होती का पिण्यासाठी होती हा नक्की संशोधनाचा विषय आहे. काही रांजणांवरील कोरीव लेख महत्त्वपूर्ण माहिती देतात. शिंगरू पठारावरील रांजण दोन तोंडांचा असून त्यावर प्राकृत भाषेत ‘हा रांजण कामवन येथील व्यापारी दामघोष याने वशिष्ठपुत्र सातकर्णी याच्या राज्यकालाच्या तेराव्या वर्षांत कोरला’ असे म्हटले आहे.

स्थानिक आख्यायिकेप्रमाणे ते काम अभियांत्रिकी क्षेत्रात निपुण असलेल्या नाना व गुणा या दोन तज्ज्ञांकडे देण्यात आले होते. त्यांपैकी जो प्रथम घाट बांधेल त्याचे नाव घाटास द्यावे असे ठरले. दोघांनीही त्यांचे कौशल्य पणाला लावले, घाट बांधणीस सुरुवात झाली. कोकणाकडे तोंड असलेल्या सह्याद्रीच्या उभ्या कड्याला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ‘नानाचा अंगठा’ असे म्हणतात.

घाटाच्या निर्मितीस त्या ठिकाणाहून सुरुवात झाली असावी. अंगठ्याच्या दक्षिण भागाकडील काम गुणाला तर उत्तरेकडील भागाचे काम नानाला देण्यात आले. नानाला दिलेला मार्ग गुणापेक्षा अवघड असला तरी त्याने तो वर्ष संपण्याआधी पूर्ण केला. साहजिकच, नानाचे नाव त्या घाटाला पडले.

सातवाहन साम्राज्यात कोकण व देश यांच्यातला व्यापार सुकर होण्यासाठी हा घाट खोदला गेला. घाटाच्या जुन्नरकडच्या तोंडाशी एक मोठे दगडी रांजण ठेवले आहे. कल्याण सारख्या मोठ्या व्यापारी शहरातून समुद्रमार्गे येणारा माल याच घाटातून जुन्नर, नेवासा, पैठण याभागात नेला जायचा. आणि त्या बदल्यात व्यापाऱ्यांकडून टोल वसूल केला जायचा.

त्यावरून याघाटाचे नाव नाणेघाट पडले असे देखील काहींच मत आहे. सातवाहन राजांनी या घाटात काही गुहा खोदल्या आहेत. घाटाच्या डाव्याबाजूला जीवधन किल्ला असून, उजवीकडे लांब लांब पसरत गेलेली हरिश्चंद्र डोंगर रांग दिसते. घाटातून दिसणारा सूर्यास्त हा नयनरम्य असतो. पावसाळा व हिवाळा हे नाणेघाट पाहण्यासाठीचे उत्तम ऋतू आहेत. 

आधी मुघलांच्या ताब्यात असलेला हा मार्ग नंतर छत्रपती शिवरायांनी आपल्या ताब्यात आणला होता. कल्याण बंदरातून आणि उत्तर कोकणातून येणाऱ्या सर्व देशी -परदेशी मालावर मुघलांना मराठ्यांकडे कर भरावा लागायचा. शिवाय प्रत्येक खाजगी व्यापार करणाऱ्याला सुद्धा कर द्यावा लागायचा. एकदा का कर भरला की खालपासून वरपर्यंत संपूर्ण मार्गावर व्यापारी मालाला संरक्षण दिले जायचे.

Leave a Comment

You cannot copy content of this page