भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अगोदर समुद्र किनाऱ्याची सुरक्षा करण्यासाठी आरमार किंवा खास समुद्रकिनाऱ्यावर किंवा खोल समुद्रात जाऊन लढणारी एक सेना असावी असा कोणी विचार केला नाही. अशी एक सैनिकांची तुकड़ी असावी अशी दूरदृष्टी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणून त्यांनी सागरी आरमाराची सुरुवात केली आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हणतात.
स्वराज्याच्या या आरमाराचे पहिले सेना प्रमुख म्हणून जबाबदारी लीलया पारपडणारे कान्होजी आंग्रे हे सेना प्रमुख होते. कल्याण भिवंडी आणि आजूबाजूच्या परिसरात जहाज बांधणीचा कारखाना होता आरमारासाठी लागणारी जहाज आणि गलबतांच्या निर्मिती या ठिकाणी होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार स्थापन करण्याची प्राथमिकता होती ते, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि डच यांच्यापासून स्वराज्याचं रक्षण करणे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचं काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी उंदेरी यांसारख्या बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्यांची बांधणी सुरु केली. समुद्रकिनाऱ्यांचं संरक्षण करणे आणि व्यापाऱ्यांना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा. स्वराज्यात व्यापारासाठी आलेल्या जहाजाना संरक्षण देऊन राज्याच्या महसूल वाढीसाठी ही उपयुक्त होत असे.
विशेष म्हणजे ज्या काळात मुघलांजवळ सार्वभौम आरमार नव्हते, कदाचित म्हणून सुद्धा महाराजांनी स्वतंत्र्य आरमाराची उभारणी जाणीवपुर्वक केलेली आसावी. पश्चिम किनाऱ्यावरील सागरी संरक्षणाची जबाबदारी औरंगजेबाने जंजिरेकर सिद्दीवर सोपवली होती. थोडक्यात मुघलांकडे असलेलं आरमार हे परावलंबी होतं. या उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारासाठी लागणारी गलबते स्वत: बांधुन त्या गलबतांवर स्वराज्याचेच खलाशी ठेवले.
दिवसागणिक वाढणाऱ्या स्वराज्याची सिमा पश्चिमेला असलेला समुद्र किनारा नैसर्गिकरित्या संरक्षक असलं तरी किनारपट्टीवर सत्ता अधिकार प्राप्त करुन घेतल्याशिवाय स्वराज्याची कोकणपट्टी सुरक्षित नाही,याची खात्रीही पटली होती. बसरुरच्या मोहिमेनंतर आलेल्या अनुभवाने शिवरायांना आरमारी प्रतीकारासाठी काही नवीन उपाययोजना करण्याची निकड वाटली.
शिवाजी महाराजांनी परदेशी पोर्तुगिज अभियंत्यांना जहाज बांधणीसाठी कामास ठेवले व त्या अभियंत्यांना मदत म्हणून त्याच्या हाताखाली जवळपास ४०० माणसे होती.
जहाज बांधणीचे काम सुरू असताना पोर्तुगीजांना शिवरायांची प्रगल्भ दूरदृष्टीची चुणूक दिसायला लागली. शिवरायांच्या सोबत काम करताना त्यांना जाणवलं शिवरायांमध्ये हे एक चाणाक्ष नौसेनानी होण्याचे सर्व गुण आहेत आणि यांच्या आरमारापासुन आपल्याला भविष्यात धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे आरमार पुर्ण बांधुन होण्यापुर्वीच पोर्तुगीज आणि त्यांचे सर्व कारागीर महाराजांची नौकरी सोडुन घाबरून पळुन गेले.
स्वराज्याचे आरमार तयार होत असताना पोर्तुगीज खलाशी विजरई कोंदी द सांव्हिसेन्ति याने इ.१६६७ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल एका पत्रात व्यक्त केलेले मत उल्लेखनीय आहे.
राजा शिवाजींच्या नौदलाची बांधणी आणि त्यांची दूरदृष्टी मला काहीशी भीतीदायक वाटते. कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर किल्ले बांधिले आणि आज त्यांच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत; पण ही तारवे मोठे नसले तरी शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी यांनी स्थानिक लोकांच्या कर्तबगारी चा वापर करून आपल्या नौदलाला टक्कर देतील अशी मोठी जहाज बांधणी करू शकतात.
अल्पावधीतच त्यांनी आरमाराची ताकद आणि महत्व ओळखलं आहे. त्यासाठी ते युद्धनौका बनवून सागरी युद्ध शिकण्याची त्यांची जिज्ञासा आहे. सिद्दीच्या विरोधात सुरू झालेलं शिवाजी राजाचं आरमार कदाचित आपल्या विरुद्ध सुध्दा युद्धासाठी सज्ज होईल.