तब्बल ४० वर्षं धरणाच्या पोटात पाण्याखाली असलेल्या ‘पळसनाथ’ मंदिर

महाराष्ट्राला दुष्काळ हा काही नवीन नाही, दुष्काळा मुळे आपल्या पोशिंद्याची तर पार दैना उडवली. पण रखरखत्या वाळवंटात जस एखादं मृगजळ सुखावून जातं. तसंच तीन चार वर्षापूर्वी दुष्काळामुळे उजनी धरणातील पाणी साठा बराच कमी झाला आहे आणि त्यामुळे पळसनाथ  येथील जवळपास ४० वर्षे  पाण्याखाली असलेले ऐतिहासिक मंदीर डोकावून पाहत होत.

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पळसदेव येथील भीमा नदीच्या पात्रात सन १९७५मध्ये जलसमाधी मिळालेले पळसनाथाचे अतिप्राचीन हेमाडपंती मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खालवल्यामुळे दिसायला लागले आहे.

या मंदिराचा काळ जरी निश्चित नसला, तरी त्याचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायात ‘पलाशतीर्थ’ म्हणून केल्याचे आढळून येते. पळसनाथाच्या मंदिराचे सर्व कोरीव काम दगडामध्ये केलेलं आहे. मंदिराच्या शिखराची बांधणी सप्तभूमी पद्धतीची आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप, गाभारा आहे. उंच शिखर, मोठ्या मोठ्या शिळा आहेत.

उजनी धरणाच्या जलसाठ्यात या मंदिराला जलसमाधी मिळाली, तत्कालीन पुनर्वसन मंत्री श्री शंकराव पाटील यांनी पळसदेवच्या ग्रामस्थांना या मंदिराच्या नुकसान भरपाई पोटी बरीच रक्कम मिळूवून दिली होती, त्या निधीमधूनच पळसदेव येथे नव्या गावठाणात श्री पळसनाथाचे नवे मंदिर उभारले.

मूळ मंदिरात असणारे शिवलिंग आणि मंदिरासमोरील नंदीची स्थापना नव्याने बांधलेल्या मंदिरामध्ये करण्यात आली. उजनी धरणाच्या अथांग भेगाळलेल्या जमिनीवरून चालत जात असताना. पळसनाथाचे मंदिर नजरेच्या टप्प्यात येते. मंदिराजवळ पोहोचायला होडीची गरज लागते.

मंदिराच्या पडक्या तटबंदीतूनच आतमधे प्रवेश केला की भग्न पण उंच, कोरीव आणि विलक्षण सुंदर मंदिर दिसतं. मंदिराच्या कळसाचे बांधकाम भाजक्या विटांमध्ये केलेल आहे. कळसावर चुन्यामध्ये बारीक कोरीवकाम केलेले दिसते. आजही काही अंशी कोरीवकाम शिल्लक आहे.

ज्या वेळी एखादा भक्त मंदिरात प्रवेश करतो, त्या वेळी त्याने आपल्या मनातील वाईट भावना ते सौंदर्य पाहून आपसूकच संपूर्ण मळभ मंदिराबाहेरच निघून जातं. मंदिराच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी आहे. तिची बरीचशी पडझड झाली आहे; मात्र दिमाखदार अस्तित्व आजही कायम आहे.

मंदिराच्या  गाभाऱ्यात प्रवेश करताना अप्रतिम कोरीव काम केलेली चौकट दिसते, त्यावर  याली, वाद्य वाजवणारे वादक, पशु पक्षी कोरलेले आहेत. बाहेरूनच गाभार्यात पहिले असता आत मध्ये फक्त गाळ शिल्लक राहिलेला आहे, मंदिरातील शिवलिंग गावकऱ्यांनी  स्थलांतरित करून आता गावामध्ये नवीन मंदिर उभारलेले आहे.

मंदिरामध्ये आता जरी देव नसला तरी, देवत्वाच अस्तित्व अजून टिकून आहे. मंदिरात जसं प्रसन्न वातावरण असतं अगदी तसं वातावरण आपण अनुभवतो. मंदिराच्या मागच्या बाजूस भगवान शिवशंकराची एक भग्नावस्थेतील मूर्ती आहे.

मंदिराचा कळस अतिशय वैशिष्टपूर्ण असा आहे. कळसाचे बांधकाम भाजक्या  विटा आणि चुना यांचा वापर करून निर्माण केलेले आहे. मंदिराचा कळस आतून पूर्णपणे पोकळ आहे. आणि आत मध्ये जाण्यासाठी १ रस्त पण आहे.

मंदिराच्या छतावर चढल्यावर २ फुट बाय १.५ फुट आकाराचा दिवळी  वजा दरवाजा आहे . त्यातून आपल्याला झोपूनच आत जावे लागते. कळसाच्या आत गेल्यावर शांततेचा अनुभव आपल्याला येतो. आतून चुन्याचा गिलावा नसल्यामुळे, कळसाच्या बांधणी मध्ये, विटांची मांडणी कश्या प्रकारे केलेली आहे हे आपल्या लक्षात येते.

कळस बांधताना आत मध्ये सागवानी लाकडाचे जे ओंडके आधारासाठी लावलेले  असतील, ते  आजही जसे च्या तसे आहेत. मंदिराचा बराचसा भाग उध्वस्त  झालेला आहे,  एके काळचे या देवळाचे वैभव  आणि आजची हि दारुण परस्थिती पाहून मन हेलावते एवढं नक्की.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page