अनेक वर्षांपासून चा खदखदत असलेला असंतोष भारतीय स्वातंत्र्याचा पहिला विद्रोह

१८५७ चा उठाव हे भारतीय इतिहासातील एक गौरवशाली प्रकरण आहे. हा उठाव कपट कारस्थाने अनैतिकता आणि शोषणाद्वारे स्थापित ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध होता. हा उठाव म्हणजे आकस्मिक घडून आलेली घटना किंवा देशाच्या एखाद्या कोपऱ्यात घडून आलेला क्षुल्लक प्रसंग किंवा घटना नव्हती.

सैनिकांच्या उठावाच्या स्वरूपात सुरू झालेल्या या उठावाने संपूर्ण भारतीय जनता एकवटली होती ज्या मध्ये सावकार, शेतकरी, मजूर, कामगार, निरनिराळ्या जातीजमातीचे लोक, सैनिक, जमीनदार, एकूणच संपुर्ण भारतीय समाज ब्रिटिशांच्या विरुद्ध एकवटला होता. हा उठाव म्हणजे कंपनी सरकारच्या धोरणाविरुद्ध भारतीय जनतेच्या मनात अनेक वर्षांपासून चा असलेला असंतोष खदखदत होता त्याचा हा उठाव द्योतक होता.

ब्रिटिश इतिहासकारांनी या उठवाला काही स्वार्थी सैनिकांचा विद्रोह होता. त्याला ना देशभक्तीची जोड होती ना राष्ट्रीय नेतृत्वाचा आधार हा केवळ संधीसाधू सैनिकांचा विद्रोह होता. परंतु या उठावाची व्याप्ती यापेक्षा कित्तीतरी जास्त होती. गोऱ्या साहेबांनी प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात जी अनावश्यक ढवळाढवळ चालू होती अन्याय अत्याचाराच्या बोज्या खाली भारतीयांना जी अपमानास्पद वागणूक मिळत होती.

त्याविरुद्ध संस्थानिक, सरंजाम, जमीनदार, सेना, यांना शेतकरी, कामगार, मजूर, आणि सामान्य नागरिक यांनी व्यक्त केलेली उस्फुर्त आणि ओघवती प्रतिक्रिया होती. सैनिकांचा असंतोष आणि चरबीयुक्त काडतुसे फक्त ही दोन कारणं सांगितली जातात परंतु एवढ्या मोठ्या उठावाची इतकी क्षुल्लक कारणं नक्कीच नसतील. पण हा १८५७ च्या उठवाची ही तत्कालीन कारण असू शकतात असं समजण्यास मात्र वाव आहे.

कारण कंपनी सरकार ने भारतीय लष्करात जुन्या ब्राऊन बॅस बंदुकीऐवजी नव्या एनफिल्ड रायफल चा वापर सुरू केला. नवीन रायफल मध्ये एक विशिष्ट प्रकारचे काडतुस वापरले जाई. वापरा पूर्वी काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागत असे. या आवरणाला गाय आणि डुकराची चरबी लावलेली असायची. त्यामुळे सैनिकांनी ती काडतुसे वापरण्यास नकार दिला.

२६ फेब्रुवारी १८५७ रोजी बहारामपूर च्या छावणीतील सैनिकांनी ही काडतुसे वापरण्यास नकार दिला. सैनिकांनी उठावाची तारीख निश्चित करून या उठावाला दुजोरा दिला. परंतु निर्धारित वेळेपूर्वी म्हणजे २९ मार्च १८५७ रोजी बराकपूर छावणीतील ३४ व्या एन आई रेजिमेंट मध्ये असलेला सैनिक मंगल पांडे यांनी या उठावाची ठिणगी पेटवली.

गोऱ्या साहेबांनी मंगल पांडे यांना फाशी देऊन भारतीय समाजाला अजून चेतवून दिले. त्यानंतर मेरठ, दिल्ली, अयोध्या, रोहिलखंड, पश्चिम बिहार येथे उठाव करून तेथील सैनिकांनी बंडाचे निशाण फडवले. बघता बघता बंडाचे निशाण कानपुर, ग्वाल्हेर, लखनऊ, झाशी, फाररुखाबाद, संबलपूर, मथुरा, सागर, रायपूर, हरियाणा, पंजाब आदी भागांत होते.

१८५७ च्या उठावाचे लोण केवळ उत्तर भारतापुरते मर्यादित न राहता ते दक्षिण भारतात देखील पसरले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तमिळनाडू आणि केरळ याभागात देखील या उठावाचे तीव्र पडसाद उमटले होते. वास्तविक अर्थाने हा उठाव राष्ट्रव्यापी होता आणि यात भारतातील सर्वच क्षेत्रातील तसेच भागातील विविध जाती धर्म भाषा आणि संप्रदायाच्या लोकांनी यात सहभाग घेतला होता.

वास्तविक पाहता हे आंदोलन एका सैनिकी विद्रोहाच्या रुपात असले तरी याचे नेतृत्व सामान्य शेतकऱ्यांच्या हातात होते ज्यात अनेक सामान्य जनताही सहभागी होती. या उठावाची महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर कोणत्याही क्रांतीचे स्वरूप त्या क्रांतीच्या सुरुवातीच्या ध्येय अथवा धोरण यावरून निर्धारित होत नसते, तर त्या क्रांतीने आपली कोणती अन कशी छाप सोडली यावर अवलंबून असते.

१८५७ च्या विद्रोहात भाग घेणाऱ्या उठावकर्त्यांचे व सामान्य लोकांचे एकच लक्ष होते ते म्हणजे इंग्रजांना भारतातून हुसकावून लावणे. हा उठाव भारताच्या इतिहासातील एक युगप्रवर्तक घटना होती. हा उठाव जरी अयशस्वी ठरला असला तरी याचे परिणाम बरेच व्यापक होते. कारण यामुळेच इंग्लंड ची राणी व्हिक्टोरिया चा भारतावर प्रत्यक्ष अंमल सुरू झाला.

Leave a Comment

You cannot copy content of this page