मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती.
शिवाजी महाराजव संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे पोर्तुगीज बरेच नमले होते. छत्रपतींच्या महानिर्वाणानंतर शाहू महाराजांच्याकारकिर्दीत मराठ्यांना पुन्हा एकदा पोर्तुगीजांना धडा शिकवणे गरजेचे ठरले. मराठ्यांचे प्रशासन कल्याण प्रांतात इसवी सन १७१९ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून मराठ्यांचा पोर्तुगीजांशी पुन्हा संघर्ष सुरू झाला.
उत्तर फिरंगाण १७३७ व १७३९ या दोन वर्षांत जवळ जवळ पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात आले. उत्तर फिरंगणात साष्टी बेट, वांद्रे, वसई, ठाणे, अंधेरीपासून वसईपर्यंतची अनेक बेटे कार्लाई, रेवदांडा, चौल, माहीम, तारापूर, चिंचणी इत्यादी परिसरांचा समावेश होतो.
वसईची लढाई मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहतकारांच्यात इ.स. १७३९ साली लढली गेलेली लढाई होती. यात मराठ्यांचे नेतृत्त्व थोरले बाजीराव पेशवे यांचा भाऊ चिमाजी अप्पा याने केले. यात मराठ्यांनी पोर्तुगीज वसाहतकारांवर विजय मिळवला.
मार्च २८, इ.स. १७३७ रोजी मराठा सैन्याने अर्नाळ्यात गाफील असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि त्यांना हुसकावून लावून किल्ला काबीज केला. या विजयाची स्मृती म्हणून किल्ल्याच्या उत्तरेकडच्या तटबंदीमध्ये एक शिलालेख कोरण्यात आला; जो अजूनही शाबूत आहे. शंकराजीपंताने लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू केली व किल्ला पुन्हा भांडता केला.
जानेवारी इ.स. १७३८पर्यंत तीन बुरूज बांधून तयार झाले. त्यांना भैरव बुरूज, भवानी बुरूज आणि बावा बुरूज अशी नावे देण्यात आली. मार्च महिन्यात किल्ला पूर्ण लढता झाल्यावर मराठा सैन्य आसपासच्या प्रदेशात पसरले व वर्सोवा तसेच धारावी या बेटांवर त्यांनी आपले बस्तान बसवले.
चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली १७ फेब्रुवारी १७३७ च्या दिवशी गुढीपाडव्यानंतर वसईच्या मोहिमेस प्रारंभ झाला. मराठे कल्याणमार्गे उत्तर कोकणात दाखल झाले. पोर्तुगीज ठाण्याच्या कोटाचे बांधकाम त्यापूर्वी काही वर्षे करत होते.
बाजीरावांनी तो कोट बांधून पुरा होण्यापूर्वीच साष्टी बेट जिंकण्याचे ठरवले. शंकराजी फडके, गंगाजी नाईक अंजूरकर यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली ते काम करण्याचे योजले.
गडाचा खाडीच्या तोंडावर असलेला बुरुज प्रथम उडवला गेला. त्यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर पळून गेला. मराठ्यांनी साष्टी बेट ताब्यात घेतले. नारायण जोशींनी पारसिकचे ठाणे जिंकले.
बेलापूर, धारावी, कल्याणजवळील सांताक्रुझ ही ठिकाणे मराठ्यांच्या ताब्यात आली. मराठ्यांनी ठाण्यावरील हल्ला चपळाईने केला आणि वसईकडे मोर्चा वळवला. चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला.
वसईच्या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना समुद्र आणि दलदल असल्याने तो किल्ला काबिज करणे अवघड होते. वसईच्या वेढ्यासाठी मराठ्यांनी दोन वर्षे कसून लढा दिला.
मोहिमेत रामचंद्रपंत, अमरसिंह, शिर्के अशा दहा-पंधरा लोकांनी मोठा पराक्रम केला. पोर्तुगीजांकडे मराठ्यांच्या तुलनेत तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रे अद्यावत होती. त्यांनी त्या साधनांच्या सहाय्याने मराठ्यांचे मोठे नुकसानही केले. मात्र मराठ्यांनी वेढा सैल पडू दिला नाही.
मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले.
अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही.
इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते. शेवटी मे १६, इ.स. १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले.
तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरुन पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले.
या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली.
तत्कालिन नोंदीनुसार त्या लढाईत मराठ्यांचे बारा हजार तर पोर्तुगीजांचे आठशे सैनिक कामी आले. चिमाजी अप्पांनी २२ मार्च १७३९ रोजी वसईची मोहिम फत्ते करून मराठ्यांच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला. विजयानंतर मराठी सैन्याने किल्ल्यातील चर्चमधील मोठ्या घंटा उतरवून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली.
यापैकी एक घंटा नाशिक येथील नारोशंकराच्या मंदिरात पाहण्यास मिळते. ती ‘नारोशंकराची घंटा’ म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरी घंटा पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात आहे. वसईचा किल्ला स्वराज्यात यावा यासाठी चिमाजी अप्पा यांनी वज्रेश्वरी देवीस नवस केला होता. मोहिम फत्ते झाल्यानंतर चिमाजी अप्पांनी वसईला वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधले.
वसईच्या लढाईनंतर मराठ्यांनी उत्तर कोकणात आपला जम बसवला; तसेच आपल्या आरमाराला असलेले कायमचे भय घालवून टाकले. गोवा, वापी व दीव यांच्यातील टप्पा असलेले बंदर व ठाणे नेस्तनाबूद झाल्याने पोर्तुगीजांची भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पकड ढीली झाली. यात मराठ्यांबरोबरच इंग्रजांचेही फावले व त्यांनी आपले मुंबईतील ठाणे अधिकाधिक मजबूत करण्यास सुरुवात केली. मराठ्यांचे सैन्य उच्च तंत्रज्ञान असलेल्या पाश्चिमात्य सैन्यांशीही टक्कर घेऊ शकते, हे स्पष्ट झाले.