नारली पुनवेचे सणाला… जाऊ दर्याचे पूजेला…

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उत्सव मोठ्या आनंदाने सुरू असतात. श्रावण महिन्यात तर उत्सवांची रेलचेल तर भरपूर असते. श्रावणात नागपंचमी नंतर सर्वात मोठा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन.

श्रावण पौर्णिमेला आपले कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाराला ७२० किलोमीटर ची मोठी किनारपट्टी लाभली आहे. पौराणिक कथांनुसार समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरूणदेव हा पश्चिम दिशेचा रक्षक आहे त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

कोळीबांधवांचे संपुर्ण आयुष्यच समुद्रासोबत एकरूप झालेले असते. त्यामुळे या महाकाय समुद्राची आपल्यावर कायम कृपा राहावी याकरीता त्याची प्रार्थना करून. किंवा ज्या सागरातून आपला उदरनिर्वाह होतो त्या सागर म्हणजे च समुद्रदेवाप्रती आपली बांधीलकी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतुने नारळीपौर्णिमेचा हा उत्सव मोठया उल्हासाने कोळी बांधव साजरा करतांना दिसतात.

आपण सर्वच भारतीय उपखंडात येत असल्याने जून पासून आपल्या इथे मान्सून च जोरदार आगमन होतं. या काळात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. त्यामुळे नारळीपौर्णिमेच्या बऱ्याच अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे थांबवले असते.

कोळी बांधव समुद्रात जाणं टाळतात याला पौराणिक भोगोलिक आणि शास्त्रीय कारण देखील आहे. ते म्हणजे एकतर तो काळ माश्यांच्या प्रजननाचा काळ समजला जातो आणि दुसरे म्हणजे पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो. आणि तिसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे कोणतीही सुरुवात करताना देवाचं अथवा नैसर्गिक शक्तीला आवाहन देत त्या शक्ती कडून आशीर्वाद घेत चांगल्या कामाची चांगली सुरुवात करण्यासाठी खास दिवस राखून की ज्या दिवशी सर्व बांधवांना समुद्रात जाणं शक्य होईल. त्यामुळे कोळी बांधव त्या दरम्यान समुद्रात जात नाहीत.

जसजसा नारळीपौर्णिमेचा सण जवळ येऊ लागतो तसे या कोळयांना मासेमारीचे वेध लागतात आणि सगळेजणं मुंबईला आपल्या कोळीवाडयांमधे परततात. नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपारीक पध्दतीने साजरा करतात.

कोळी बांधव आपला पारंपारीक वेश परिधान करतात. कमरेला रूमाल अंगात टिशर्ट आणि डोक्याला टोपी आणि स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करून अक्षरशः सोन्याने मढतात. कोळी स्त्रिया कायमच सोन्याचे भरपुर दागिने आंगभर घालत असल्याने सामान्यांना कायमच त्याचे अप्रुप वाटत आले आहे. पण जर तुम्हाला संधी मिळाली तर नारळी पौर्णिमेला अश्या बांधवांच्या घरी गेलात तर तुमचं होणारं आदरातिथ्य आणि त्यांचं प्रेम पाहून खरोखरच आपणही त्यांच्यातीलच एक आहोत की काय अशी भावना होत असते.

सायंकाळच्या वेळेला समुद्राची पुजा करण्यासाठी सारे बांधव निघतात. दर्याला सोन्याचा नारळ अपर्ण करून भक्तिभावाने पुजा करतात. ज्यांना शक्य आहे ते सोन्याचा नारळ तर काही जण नुसता नारळ पण कामाप्रती आणि सागरा प्रती असलेलं प्रेम पाहून  वरुण राजाही सुखावत असेल एवढं नक्की.

गोडाधोडाचा नैवैद्य दाखवुन सागराला गार्हाण घातलं जातं. दरम्यानच्या काळात बांधव होड्यांची डागडुजी करून आपापल्या बोटी रंगरंगोटी करून सजवितात. बोटींना पताका लावुन सुशोभित केल्या जाते. बोटींची पुजा करून मगच त्यांना मासेमारीकरता समुद्रात लोटतात.

कोळी स्त्रिया सागराला प्रार्थना करतात. आमच्या बोटीवर वर्षभर भरपुर मासोळी गावुदे (सापडु दे) समुद्रात माझा घरधनी येईल त्यावेळी त्याचे रक्षण कर. कोणतेही संकट नको येऊ देऊस.

कोळी बांधव ज्यावेळी मासेमारीकरता समुद्रात रवाना होतो त्यावेळी कोळी स्त्रियांची संपुर्ण मदार सागरावर असते. आणि म्हणून कदाचित म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी या महिला समुद्रासोबत भावाचं भावनिक आणि हळवं नातं जोडत. धन्याचे रक्षण कर म्हणुन त्या मनोमन दर्याला आराधना करतात.

कोळी महिला भगिनी ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करतात. एकूणच कोळीवाडय़ातील उत्साह शिगेला पोहोचतो. काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येतात.

नारळी पौर्णिमेच्या निमीत्ताने बनवलेल्या खास नारळाच्या करंजांचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो. त्यानंतर आपापल्या कोळी पाडयांवर पारंपारीक गिते गायली जातात. मिरवणुका काढल्या जातात. नारळ फोडण्याचा खेळ खेळला जातो. विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. कोळी स्त्रिया भरजरी कपडे घालुन पारंपारीक नृत्य करतात.

हिंदु बांधवांचे सगळेच सण पर्यावरणाशी आणि निसर्गाशी निगडीत असल्याचे या सणांची माहिती घेतल्यावर आपल्या लगेच लक्षात येते. निसर्ग हा माणसाकरता सतत सकारात्मक राहावा त्याची कायम आपल्यावर छत्रछाया राहावी म्हणुन हे सण उत्सव मनुष्य कायम परंपरेने पाळत आलेला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page