naane shivraai

स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे नाणे ‘शिवराई’

Itihas

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर तमाम भारतीयांचे प्रेरणास्थान. अगदी आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या छोट्या मोठ्या संघर्षांत आपण त्यांना आदर्श मानतो आणि येणाऱ्या संकटाचा सहज सामना करतो.

६ जून १६७४ या दिवसाच महत्त्व तमाम मराठी जनांना नक्कीच असणार कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्याच दिवसापासून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी महाराजांनी त्याचं शिवराई हे चलनसुद्धा स्वराज्यात सुरू केलं.

शिवराज्याभिषेका सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशक सुरू केलं. मराठी भाषेवर उर्दू फारसी व इतर भाषांचं होणारं अतिक्रमण पाहता नवीन राजव्यवहारकोष हा मराठी भाषेचा शब्दकोश निर्माण केला ज्यामध्ये हिंदू पद्धतीची पत्रव्यवहार लेखन पद्धत सुरू केली.

स्वराज्याचं प्रतिनिधीक स्वरूप कळावं म्हणून शिवराई हे चलन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं. वरकर्णी चलन निर्मिती ही साधी घटना असली तरी ही एक क्रांतिकारक घटना होती. उर्दू आणि फारसी लिपीत असलेली चलन यांना छेद देत देवनागरी लिपीमध्ये चलन सुरू केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ साली टंकसाळ सुरू केली. त्या टंकसाळेत त्यांनी तांब्याच्या धातूंच पहिलं नाणं सुरू केलं ते नाणे म्हणजे शिवराई. या शिवराई चा कागदोपत्री उल्लेख १६८३च्या एका पत्रात “शिवराई”चा उल्लेख आलेला आहे.

या नाण्याच्या दर्शनी बाजुला ‘श्री राजा शिव’ असे तीन ओळीत लिहिले असून, तर मागील बाजूस ‘छत्र पती’ असा दोन ओळीत मजकूर असतो. या नाण्यांचा आकार साधारणतः गोलाकार असून, अत्यंत सुबक देवनागरी अक्षरात लिहिलेलं आहे. त्याकाळी शिवराई चे वजन एक तोळाभर असायचे. म्हणजे जवळपास ११ ते १३ ग्रॅम वजनात च्या आसपास. या एक शिवराईचे मूल्य एक पैसा असे ६४ शिवराई मिळून एक रुपया होत असे.

११ ते १३ ग्रॅम वजनाची आख्खी शिवराई, तर ६ ते ७ ग्रॅमची अर्धी आणि ३-४ गॅमची पाव शिवराई असायची. या विविध परिमाणांच्या शिवराईंची घडणावळ व अक्षरे सारखी असायची.

काही नाण्यांवर  ‘श्री राजा शिव ,छत्र पती’ हे मजकुर देखील वेग वेगळ्या पद्धतीने लिहिलेले असायचे. जसे की श्री राजा ची घडणावळ सारखी असली तर शिव लिहिण्याची पध्दत काही वेळा शीव, सिव, सीव अशी अक्षरे उमटलेली असायची तर काही शिवराईंवर मागील बाजूला असलेल्या ‘छत्र पती’ मधील ती या अक्षराचा ऱ्हस्व आणि दीर्घ प्रकार पाहायला मिळतो. कदाचित हे वेगवेगळ्या टंकसाळेत निमिर्ती होत असल्याने त्या त्या टंकसाळेची ओळख म्हणून असा मजकूर उमटवण्याची शक्यता असावी.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या सोन्याच्या नाण्यास ‘शिवराई होन’ म्हणत असे. स्वराज्याची राजधानी रायगडावरील टांकसाळीत फक्त ‘शिवराई होन’ पाडण्यात येत असत. रुका, तिरुका, सापिका आणि ससगणी ही नाणी स्वराज्याच्या इतरत्र असणाऱ्या टंकसाळेत पाडण्यात येत असावे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *