mavalcha rakshak

स्वराज्यामध्ये महत्वाची भूमिका बजवणारा हिरडस मावळचा रक्षक

Itihas

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीच्या काळात स्वराज्यातील बारा मावळांनी भरभरून साथ दिली होती. त्यापैकीच एक मावळ खोरं म्हणजे हिरडस मावळ! सह्याद्रीचं अनोखं रूप घेऊन नटलेलं खोरं आपलं भान हरपायला लावणारं आहे. या मोहवणाऱ्या खोऱ्याने स्वराज्यात खूप मोलाची आणि कणखर कामगिरी बजावली.

पुणे जिल्हय़ातील भोर तालुक्याच्या गावाजवळच असलेल्या या हिरडस मावळात जसे डोंगर आणि गड-किल्ले आहेत, तसेच या मावळाने स्वराज्यासाठी लढणारे लढवय्ये जन्माला घातले. बाजीप्रभू देशपांडें, जेधे, बांदळ, कंक, मालुसरे यांच्या सारखी मातब्बर नामांकित लढाऊ घराणी देखील याच भागातली! म्हणूनच स्वराजाचा इतिहास आणि पराक्रम यांचं हिरडस मावळाशी नातं तसं घट्टच!

रोहिड्या किल्ल्याच्या निर्मितीचा कालखंड हा यादवकालीन असण्याची शक्यता आहे. गडावर असलेल्या शिलालेखात या किल्ल्याची डागडुजी आदिलशाह ने केल्याचा उल्लेख आढळतो. १६५६ साली हा किल्ला आणि आसपास चा परिसर स्वराज्यात आला.

१६५६ च्या झालेल्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराज आणि बांदल सैनिक यांच्यात लढाई झाली आणि भाग स्वराज्यात आला. बांदल सैनिकांचे प्रमुख बाजी देशपांडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात येण्याची विनंती केली व स्वराज्याचं महत्त्व पटवून दिलं.

१६६६ साली झालेल्या पुरंदर च्या तहात रोहिडा मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु पुढच्या चारच वर्षात हा बिनीचा किल्ला परत स्वराज्यात आला. २४ जून १६७० मध्ये हा किल्ला पुन्हा स्वराज्यात जिंकून घेतला. आणि या किल्ल्याची आणि आस पासच्या गावची देशमुखी कान्होजी जेधे यांना दिली. 

रोहिडाकडे येण्यासाठी पुणे-भोर- बाजारवाडी असा गाडीरस्ता आणि यावर धावणा-या एसटी बससुद्धा सोयीच्या आहेत. याशिवाय महाडवरून वरंधा घाटाचे सौंदर्य न्याहाळत देखील भोरमध्ये येता येते. भोर गावातच शिवछत्रपतींचा अप्रतिम अश्वारूढ पुतळा उभा आहे. या पुतळय़ाला वंदन करूनच रोहिडा किल्ल्याकडे जाता येते.

खडय़ा चढाईनंतर गडमाथ्यावर जाण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे तीन दरवाजे पार करून जावे लागतात. यापैकी पहिला दरवाजा हा गोमुख पद्धतीचा असून त्यावर गणेशपट्टी आहे. दुसरा दरवाजादेखील गोमुख पद्धतीचा असून त्यावर दोन्ही बाजूला काल्पनिक पशू शरभाचं चित्र कोरलेलं दिसून येतं. या दरवाजानंतर लगेचच उजव्या बाजूला भूमिगत पाण्याचं टाकं दिसून येतं. आजही हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं.

तिसरा दरवाजा मात्र विशेष सुंदर आहे. येथे देवनागरी आणि फारसी भाषेतले शिलालेख कोरलेले दिसून येतात. यातील फारसी शिलालेखाचे संशोधकांनी वाचन केले आहे. त्यावरून त्यांनी असे अनुमान काढले की, हा दरवाजा मुहम्मद आदिलशाहच्या कालावधीत साधारण सोळाव्या शतकात बांधला.

या दरवाजावरील शिल्पकाम, शिलालेख, हत्तींची शिल्पे, बांधणी खरोखरीच महत्त्वाची आहे. तिस-या दरवाजानंतर आपण लगेचच गडाची महत्त्वाची वास्तू असलेल्या सदरेवर येतो. या सदरेमागेच किल्लेदाराच्या वाडय़ाचे अवशेष पाहायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *