ओडिशाच्या नायगड जिल्ह्यातील भापुर ब्लॉकमधील एका ठिकाणी महानदीच्या गर्भाशयातून नामशेष झालेल्या मंदिराचा कळस पुन्हा डोकावू लागतो. महानदी व्हॅली हेरिटेज साइट्सच्या डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट दरम्यान या प्राचीन मंदिराचे काही भाग दिसले. हे मंदिर सुमारे ५०० वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते.
इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने दावा केला की त्यांनी हे मंदिर शोधले आहे. हे मंदिर हिंदू देवता विष्णू चा अवतार गोपीनाथ यांचं असून भगवान गोपीनाथ यांची मूर्तीचं पूजन या मंदिरात केलं जातं असे. मंदिराची उंची सुमारे ६० फूट उंच आहे. मंदिराची रचना १५ व्या किंवा १६ व्या शतकातील असावी असा अंदाज आहे.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सुमारे दोनशे वर्षांपूर्वी म्हणूजे इ.स. १८०० ते १९०० च्या दरम्यान पद्मावती गाव होते. नंतर महानदीत वारंवार पूर आल्याने हे गाव महानदीत सामावून घेतले. इथले स्थानिक लोक उंच ठिकाणी गेले. वाढत्या नदीच्या प्रवाहाने त्या गावची कला आणि संस्कृतीही नदीत लीन झाली आहे. हा परिसर प्राचीन गोपीनाथ मंदिराचा भाग असल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे.
मात्र पुरानंतर दुसऱ्या जागी गाव स्थापन करताना गावकऱ्यांनी या मंदिरामधील देवता स्वत:बरोबर नेली आणि गावामधील नव्या मंदिरात स्थापन केली, असं पुरातत्वशास्त्रज्ञ असणाऱ्या पवित्रा कुमार सुबुधी सांगतात. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ११ वर्षांपूर्वीही मंदिराचा कळस दिसून आला होता. मात्र आता नदीमधील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पुन्हा हा कळस दिसत असल्याचे गावकरी सांगतात.
संशोधकांच्या मते, ज्या ठिकाणी हे मंदिर सापडले आहे त्याला सातपातना म्हणतात. इथे सात गावे असायची. या मंदिरात सात गावांतील लोक भगवान विष्णूची पूजा करायचे. पद्मावती गावही या सात गावांपैकी एक होते. नंतर नदीत वारंवार आलेल्या पुरामुळे हे गाव नदीत डुंबले आणि इथले लोक उच्च ठिकाणी स्थायिक झाले.
१८ व्या किंवा १९ व्या शतकात बोरेही नावाच्या खेड्यातही मंदिर अशाच परिस्थितीत नदीत लुप्त झाले. सध्या पद्मावती गावात बाळूंकेश्वर घाटातून मंदिराचा कळस दिसतो. स्थानिक लोकांनी इथं ऐतिहासिक संशोधनाची मागणी केली आहे.
स्थानिक गाकवऱ्यांनाही आता या मंदिरासंबंधित सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याची मागणी केली आहे. शक्य असल्यास हे मंदिर नदीपात्रामधून बाहेर काढावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या मंदिरामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील असं गावकऱ्यांची आशा आहे.
आयएनटीएसीएचने इतिहासतज्ज्ञ अनिल धीर यांच्या नेतृत्वाखाली महानदीच्या पात्रातील इतिहासाचा शोध आणि संवर्धन करण्याचं काम हाती घेतलं आहे. याच संशोधनादरम्यान हे मंदिर सापडलं असल्याचा दावा संशोधन कर्त्यांनी केला आहे.