मदारी मेहतर ही व्यक्ती इतिहासाच्या पानांत आहे पण इतिहासात आहे का?

इतिहासात नवे नवे संदर्भ सापडत जातात आणि इतिहास बदलत जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे आग्र्याहून सुटकेचा.

जेंव्हा जेंव्हा आग्र्याहून सुटकेचा प्रसंगाचा उल्लेख येतो तेंव्हा तेंव्हा मदारी मेहतर चा उल्लेख येतो. इतकंच नव्हे तर काही स्वयंघोषित  इतिहास कारांनी रायगडावर एक जागी शोधून त्याच नामकरण मशीद मोर्चा किंवा मदारी मेहतर मोर्चा असे सांगितले जाते त्यात किती खरे पणा आहे ते पाहिलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास करायला हवा.

यापात्राविषयी देखील बरेच मतमतांतरे आणि वाद विवाद आहेत. त्या वादात न पडता आपल्याला एखादा समकालीन काही माहिती मिळते का पाहुयात. आग्र्याहून मदारी मेहतर पुन्हा कधी स्वराज्यात खरच आला का? या सर्वांचा थोडक्यात आढावा आपण या लेखात घेऊयात.

मिर्झा राजे जयसिंग दक्षिणेला मोठा फ़ौजफाटा घेऊन स्वराज्यात चाल करून आला होता. स्वराज्यावर आलेल्या संकटावर तोडगा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना नाईलाजाने दि. ५ मार्च १६६६ रोजी पुरंदरला तह करावा लागला. तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेबास भेटावयास जावं लागलं.

छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे असणाऱ्या कही साथीदारांची नावे आपल्याला मिळतात ज्यात मदारी मेहतर यांचं नाव प्रकर्षाने जाणवतं. पण हे नाव कोणत्याही समकालीन पत्रात किंवा बखरी मध्ये दिसत नाही अगदी मुघली कागदपत्रांमध्ये देखील मदारी मेहतर हे नाव आढळत नाही.

ऐतिहासिक समकालीन आणि जी शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी खात्रीशीर संदर्भांमध्ये मदारी किंवा मेहतर असं नाव असलेली व्यक्ती आढळत देखील नाही. मदारी मेहतर याचा पहिला उल्लेख सातारा येथील राजोपाध्ये घराण्यातील एका कागदपत्रात आग्रा भेटीचा वृत्तांत लिहिला त्यात ते नाव आढळते.

पण हा वृत्तांत कुणी आणि कधी लिहली आहे याबद्दल माहिती मिळत नाही. त्यामुळे हा कागद शिवकालीन आहे की नाही याबाबत काहीच माहिती देता येत नाही. त्यासोबत कागदानुसार घडलेला प्रसंग देखील थोडा काल्पनिक किंवा खोटा वाटतो ज्यात शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून पलायन कसे करायचे याबाबत माहिती दिली.

ज्यात हिरोजी आणि मदारी मागे राहून, वेळ मिळेल तसा तिथून निसटून येतील. पण हिरोजी आणि मदारी हे फौलादखान द्वारे पकडले जातात ज्यात हिरोजी यांना मस्तक उडवण्याची शिक्षा दिली जाते.

यावर उत्तर देताना हिरोजी औरंगजेबास म्हणाला खुशाल शिरच्छेद करावा हा जीव महाराजांवर ओवाळून टाकला आहे. हिरोजीचं हे उत्तर पाहून औरंगजेब खुश होऊन ‘तु इमानी चाकर आहेस मी मेहरबान झालो आहे आणि औरंगजेबाने दोघांना सोडून दिले.

एवढा मोठा क्रूर औरंगजेब आणि फौलादखानाच्या नाकाखालून सहीसलामत छत्रपती शिवाजी महाराज सुटले हा राग अनावर झालेला असताना एवढ्या सहजासहजी कोणाला सोडेल हे न पटणारं आहे.

यावर अजून आक्षेप घेण्याचा प्रसंग म्हणजे हिरोजी स्वराज्यात आल्यावर शिवाजी महाराज त्यांना रायगड ची किल्लेदारी देतात. स्वतः शिवाजी महाराज किल्ल्यावर असताना ते हिरोजींना किल्लेदारी देतील कशी? त्यामुळे या कागदाची विश्वासहर्ता कितीपत आहे हा प्रश्नच आहे. 

सभासद बखर जी अत्यंत विश्वासू दस्त समजला जातो त्यात देखील मदारी मेहतर यांचा उल्लेख आढळत नाही. तसेच समकालीन पत्रसार संग्रह किंवा कल्याणदास आणि परकालदास यांचा पत्रसारसंग्रहा मध्ये देखील मदारी मेहतर यांचं नाव समोर येत नाही.

या सोबतच रायगड किल्ल्या वर महाद्वाराजवळ एक ठिकाण दाखवले जाते. त्याला मशिद मोर्चा किंवा मदारी मेहतर मोर्चा असे म्हटले जाते त्याचा. मुळताच हे ठिकाण कधी निर्माण झालें याबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही माहिती उपलब्ध नाही.

राज्याभिषेकवेळी असणारे रायगडाचे वर्णन उपलब्ध आहे त्यात पण असे काही ठिकाण होते असा उल्लेख मिळत नाही. ना सभासद यांनी लिहिलेल्या बखरी मध्ये ना इंग्रजांच्या कोणत्या शिवकालीन साहित्यात.

शिवचरित्राचा अभ्यास करणारे गजानन भास्कर मेहंदळे हे गेली ४५ वर्षे शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. ज्यात जवळपास ७००० हजाराहून संदर्भ आहेत त्या कोणत्याही साधनांत मदारी मेहतर हे उपलब्ध नाही.

समकालीन कागदपत्रांमध्ये मदारी मेहतर हे नाव आढळत नाही. मदारी मेहतर हे पात्र खूप नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कादंबरी मध्ये आहे. कादंबरी समकालीन काही संदर्भ घेऊन प्रसंगाची माहिती अधिक रंजक पणे दाखवली जाते त्यातच मदारी मेहतर यांचा उल्लेख आला असावा.

Leave a Comment

You cannot copy content of this page