शाहू महाराजांना लोककल्याणकारी राजा असं का म्हणतात याची छोटी झलक

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख किंवा इतिहास सांगितला जातो तेंव्हासर्व प्रथम नांव समोर येतं ते राजर्षी शाहू महाराज यांचे. महाराष्ट्राने देशाला अनेक समाज सुधारक दिले, जसे की महात्मा फुलें, बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारखे असे अनेक मातब्बर पुत्रांनी महाराष्ट्राची सेवा केली. या सर्व महान समाज समाजसुधारकांना ही समाजाप्रती काही तरी करण्याची प्रेरणा कदाचित शाहू महाराज सुद्धा असतील कारण, समतेची शिकवण देणारे शाहू महाराज हे लोकोत्तर पुरूष होते.

समाजातल्या लहान थोरांना, अगदी तळागाळातील लोकांना त्यांचा आधार वाटायचा. भारतात कदाचित पहिल्यांदा सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शिक्षणाची आणी वसतिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरूष होते. फक्त मुलांनाच नव्हे तर मुलीच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहान दिले.

सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल’ ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. 

भारतातील काही बड्या संस्थानिकांसह छत्रपती शाहू महाराज युरोप दौऱ्यावर गेले होते. महाराजांचा हा युरोप दौरा करवीर रियासतीच्या दृष्टीने आमूलाग्र क्रांतिकारक बदल घडवून आणणारा ठरला. महाराजांच्या सोबत असणारे इतर राजे-महाराजे सहलीचा आनंद उपभोगत होते तेव्हा हा रयतेचा राजा युरोपातील प्रगत तंत्रज्ञान, तेथील शेतीच्या पद्धती अशा मिळेल त्या गोष्टींचा अभ्यास करीत होता.

या दौऱ्यात महाराजांनी रोमचे मैदान पाहिले यावरुनच महाराजांना खासबाग मैदान निर्माण करण्याची कल्पना सुचली. आज लाखो शेतकऱ्यांना “जीवन” देणारे व महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र असणारे “राधानगरी धरण” सुद्धा महाराजांच्या अशाच एक कल्पनेची परिणती! परंतु राजर्षी शाहूमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला.

राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्‍नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या बचतीमधून इ.स. १९०७ मध्ये महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली. १९ फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव “राधानगरी’ ठेवण्यात आले. १९०९ मध्ये धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी ओळखले जाते.

शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. त्याकाळची आर्थिक कुवत लक्षात घेता छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेल्या धरण बांधणीच्या निर्णयामधून महाराजांची दूरदृष्टी व महाराजांची स्वराज्याची आणि सामान्य असणारी निष्ठा प्रतीत होते. राजेशाही धुडकावून “लोकशाही” चा अंगिकार केलेल्या भारताच्या सर्वोच्च सभागृहात आज याच एकमेव “राजा” चा पुतळा दिमाखात उभा आहे तो त्यांच्या कर्तृत्वामुळेच.

Leave a Comment

You cannot copy content of this page