३०० वर्षांत कधीही न आटलेली विहीर आणि त्या विहिरीवर बांधलेला राजवाडा

विहीर म्‍हटले की त्‍यात एकसमान चौकोनी थंड ओलसर काळे कुळकुळीत खडक, स्वच्छ काचेसारखं गारेगार पाणी, पाणी कमी असेल तर नजर पाण्याच्या आरपार जाऊन दिसणारा तळ, त्यात भिर भिरणारे मासे, एखादं कासव, टूनकन उडी मारणारा बेंडूक, किंवा कमी पाण्याच्या प्रदेशात भली मोठी पाण्यासाठी लागलेली रांग, कमी जास्त पाणी मिळालं म्हणून झालेली भांडणं असेच चित्र आपल्‍या समोर उभे राहते.

पण, ११० फूट खोल आणि ५० फूट रुंद असलेल्‍या विहिरीमध्‍ये तुम्‍ही कधी राजवाडा पाहिलाय? विहिरी मध्ये राजवाडा नाही नाही ही अतिशयोक्ती नाही! पण, अशी एक शिवकालीन विहिरी सातारा शहराजवळ असलेल्‍या लिंब नावाच्‍या गावात आहे. या राजवाड्यात अत्‍यंत सुंदर अशी शिल्‍पे असून, आत सुद्धा सिंहासन आहे. ही नितांत सुंदर वास्‍तू नेमकी कशी बांधली, याचे आजही वास्‍तूविशारदांसाठी एक कोडे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच, कित्येक किल्ल्यांची डागडुजी करून त्यांना नवं वैभव दिलं. त्यावेळच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यांतूनच दिसते असे नाही तर या ठिकठिकाणी अन्य प्रकारची दर्जेदार बांधकामे झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराज स्वतः एक उत्तम स्थापत्यशास्त्राचे उत्तम जाणकार होते. गड कोट किल्ले यांचं स्थापत्य व त्यातील अनुभव बहुतेक गड किल्ल्यांवर दिसतो. याचंच एक उत्तम नमुन म्हणजे आपल्या साताऱ्या जिल्हातील लिंब गाव येथील बारा मोटेची विहीर.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज (पाहिले शाहु महाराज) यांच्या काळात या विहिरीचे बांधकाम झालं. शके १६४१ ते १६४६ म्हणजे इसवी सन १७१९ ते १७२४ च्या दरम्यान शाहू राजे यांच्या पत्नी विरुबाई यांच्या देखरेखीखाली या विहिरीचे बांधकाम झाले.

ही विहीर ११० फूट खोल असून तिचा व्यास साधारण ५० फूट आहे. तर लिंब गाव परिसरात सुमारे ३०० ‘अमराई’ च्या झाडांना पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली गेली असावी. असा अंदाज इतिहासाकार लावतात. पण स्थानिकांच्या मते त्या विहिरिचा वापर त्याकाळचे स्थानिक देखील करत असे.

अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर. या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे एक भला मोठा आणि देखणा महाल आहे. या विहिरीत उतरताना आकर्षक पण भक्कम कमान दिसते. विहिरीत उतरायला दगडी पायऱ्या आहेत. कमानीतून उतरल्यानंतर आपण छोट्या विहिरीत जातो. छोट्याशाच असणाऱ्या या एका विहिरीला तळापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या असून, नितळ पाण्यात त्या आजही दिसतात. त्यानंतर पुढे मुख्य विहीर आहे.

सध्या ही विहीर पाण्याने भरलेली आहे. आजही या विहिरीचा वापर पिण्यासाठी आणि शेतीसाठी केला जातो. या विहिरीच्या वर राजमहाल बांधलेला आहे. या विहिरीतूनच चोरवाटेने या महालाकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या आहेत. या छोटेखानी राजमहालाला मध्यभागी चार खांब आहेत. प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत.

विविध नक्षीदार फुलांची तसेच अश्वारुढ, गजारुढ राजांची शिल्पेही पाहावयास मिळतात. या राजमहालाच्या पायऱ्या चढून आल्यास महालावर राज सिंहासन दिसते. एवढे सगळे सुंदर मनमोहक अवशेष पाहून महालाच्या छतावर आलो की सिंहासनाची जागा आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. स्वत: थोरले शाहू महाराज तिथे बसायचे.

या विहिरीवर १५ मोटांची जागा म्हणजेच उपसा काढण्यासाठी जागा म्हणजे मोट आहेत. पण, १२ मोटाच प्रत्यक्षात सुरू होत्या. बारेदार दिवसभर पाणी देत असत. यावरूनच या विहिरीला बारामोटेची विहीर हे नाव पडले असावे. या परिसरात साडेतीन हजार वृक्षांची आमराई होती.

त्यासाठी याच विहिरीतून पाणी दिले जात असे. म्‍हणूनच या विहिरीला बारा मोटांची विहीर असे म्‍हणतात. विहिरीसाठी दगड आणावे लागले होते. हे दगड आणण्यासाठी जो गाडा वापरला होता त्याचे चाक आजही येथे पाहायला मिळते. या विहीरीच्या समोर मोडी लिपितील शिलालेखही आहे.

पुणे-सातारा-बेंगलोर महामार्गा पासून साधारण १०० किमी अंतरावर डावीकडे ‘लिंब फाटा’ लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून ३ किमी पुढे आहे). हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस ‘शेरी’ नावाचा परीसर आहे.

तिथं चौकशी केल्यावर कोणीही माहिती देईल. येथेच विहीर पहावयास मिळेल. इतिहासातील अनेक घटनांची साक्षीदार असणारी शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर आवर्जून पाहायला हवीय.

Leave a Comment

You cannot copy content of this page