ऑपरेशन ब्लु स्टार ची कमान समर्थपणे सांभाळणारा मराठी शिलेदार

धैर्य आणि समजूतदार पणासाठी लोकप्रिय असलेले जनरल अरुण कुमार श्रीधर वैद्य यांनी कर्तव्यनिष्ठेच्या शिखरावर स्पर्श केला होता. यासाठी आपल्या देशाने आणि भारतीय सैन्याने त्यांना मान सन्मान आणि पदक दिले.

लष्करी अधिकारी अजूनही त्यांच्या कामाच्या पद्धती लक्षात ठेवतात आणि त्यांच्या पध्दतीने काम करण्याचा प्रयत्न करतात. भारताचे दहावे लष्करप्रमुख असलेल्या अरुण कुमार यांचा जन्म अलिबाग येथे झाला. त्यांचे वडील श्रीधरपंत सरकारी अधिकारी होते. आईचे नाव इंदिरा, तर पत्नीचे नाव भानुमती. त्यांचे शालेय शिक्षण अलिबाग येथे व पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन विद्यालयात झाले.

एल्फिन्स्टन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांनी सैन्यात कॅडेट म्हणून प्रवेश मिळविला. पुढे ‘डेक्कन हॉर्स’ या चिलखती दलात त्यांची सेकंड लेफ्टनंट या पदावर नेमणूक करण्यात आली.

निजामाच्या हैदराबाद संस्थानावरील कारवाईत त्यांनी दौलताबाद, परभणी या भागांत कॅप्टन या नात्याने महत्त्वाची कामगिरी पार पाडली. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा विवाह झाला.

पुढे वेलिंग्टन म्हणजे आत्ताच्या तमिळनाडू येथे त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील सैनिकी अधिकारी होण्यासाठी चा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते लडाखमध्ये एक वर्ष कामगिरीवर होते. काही काळ दिल्ली येथे सैनिकी सचिवाच्या विभागात लेफ्टनंट कर्नल म्हणूनही त्यांनी काम केले.

डेक्कन हॉर्स या पलटण साठी त्यांनी कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. भारत-पाक संघर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन हॉर्स या पलटणीने खेमकरणाच्या लढाईत उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या तुकडीने शर्मन रणगाड्यांच्या साहाय्याने पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांच्या धुव्वा उडविला.

या युद्धात वैद्य यांनी दाखविलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल भारत सरकारने त्यांना महावीरचक्र बहाल करून त्यांचा गौरव केला. त्यानंतर ब्रिगेडिअर या पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आली. पूर्व विभागात १६७ Mountain Division चे कमांडर म्हणूनही त्यांनी काम केले. त्यावेळी नागा बंडखोरांना पकडण्याची यशस्वी मोहीम त्यांनी पार पाडली. त्याबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवापदक देण्यात आले.

त्यानंतर वैद्य यांची नेमणूक अहमदनगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल येथे समादेशक म्हणून झाली. पुढे मेजर जनरल म्हणून पहिल्या चिलखती दलाचे त्यांनी नेतृत्व केले.

चक्रा, देहलरा आणि बसंतर येथे पाकिस्तानबरोबरच्या युद्धांत त्यांनी धैर्य, धीमेपणा व रणनेतृत्व दाखवून शत्रूला नामोहरम केले. त्यांच्या तुकडीने शत्रूच्या प्रदेशात २० किमी. पर्यंत मजल मारून शत्रूचे ६० रणगाडे नष्ट केले व बसनारनजिकचा महत्त्वाचा पूल काबीज केला. या त्यांच्या कुशल रणनीतीबद्दल भारत सरकारने त्यांना दुसऱ्यांदा महावीरचक्र प्रदान केले. दोनदा महावीरचक्र मिळविणारे अरुणकुमार वैद्य हे एकमेव सेनाधिकारी आहेत.

खलिस्तान समर्थक जेलसिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या साथीदारांकडून अमृतसरमधील सुवर्ण मंदिर मुक्त करण्यासाठी जनरल वैद्य यांनी वादग्रस्त ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची योजना आखली होती.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार त्यांनी आपले संपूर्ण काम अतिशय चोखपणे केले होते. या ऑपरेशनच्या पूर्ती साठी जनरल वैद्य यांना तेंव्हा सर्वात कठीण आणि वेदनादायक निर्णय घ्यावे लागले होते. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे वैद्य हे खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांच्या हिट यादीमध्ये होते त्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत असत.

ऑपरेशन ब्लू स्टारच्या सुमारे दोन वर्षांनंतर १० ऑगस्ट १९८६ रोजी दहशतवाद्यांनी हरजिंदरसिंग जिंदा आणि सुखदेवसिंग सुखा यांनी पुण्यात वैद्य यांची हत्या केली. त्यावेळी वैद्य त्यांच्या पत्नीसह कारमध्ये जात होते. त्यावेळी दोन्ही दहशतवाद्यांनी त्यांना अतिशय जवळून गोळ्या घालून पळ काढला. १९९२ मध्ये जिंदा-सुखा या दोघांना फाशी देण्यात आली.

Leave a Comment

You cannot copy content of this page