हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि ही भूमी पावन झाली. शिवजन्म झाला आणि शिवनेरीच्या भूमीवर ढोल, नगाडे घुमू लागले. महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये “शिवनेरी” या किल्ल्याचे एक अढळ स्थान आहे.
पुण्याच्या उत्तरेस जुन्नर पासून म्हणजेच एकेकाळचे “जीर्णनगर” येथून जवळच शिवनेरी किल्ला लागतो. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून सह्याद्रीच्या नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची साधारणतः 3500 फूट आहे.
1595 रोजी हा किल्ला आणि जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. छत्रपती शिवाजी महाराजांना “शिवाजी” हे नाव या गडावरील “शिवाई देवी” वरून पडले. माता जिजाऊ गर्भवती असताना त्यांनी या देवीकडे नवस केला की, ‘पुत्र झाल्यास तुझे नाव देईल’. त्यामुळे महाराजांचे “शिवाजी” हे नामकरण करण्यात आले.
गडावर पाहण्यासारख्या अनेक वास्तू आजही सुस्थितीत आहेत. गडाचा पसारा तसा अवाढव्य आहे. गडावर शिवाई देवीचे मंदिर, गुहा, दरवाजे, अंबरखाना, यमुना – गंगा ही पाण्याची टाकी अशा अनेक वास्तू पाहायला मिळतात.
शिवनेरी किल्ल्यावरील सर्वात आकर्षक ठिकाण म्हणजे “शिवजन्मस्थळ”. शिवजन्मस्थानाची इमारत अतिशय भव्य आहे. ही इमारत दुमजली असून येथे शिवमुर्ती आणि पाळणा आहे. या इमारतीच्या बाजूला भव्य मोठे “बदामी पाण्याचे टाके” दिसते.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या शिवनेरी गडावर येऊन मन प्रसन्न होते. दोन तासांच्या वेळेत हा गड पाहून होतो. या गडावर सह्याद्रीतील चावंड, नाणेघाट, जीवधन हे इतर किल्ले दिसतात. याशिवाय वडज धरणाचा जलाशय दिसतो.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.