खिद्रापूर ला खिद्रापूर आणि कोपेश्वर मंदिराला कोपेश्वर का म्हणतात ठाऊक आहे का?

कोल्हापूरहून इचलकरंजी कडून अथवा सांगलीहून नरसोबाची वाडी- कुरुंदवाड मार्गे खिद्रापूर ला जाता येते. महाराष्ट्रातील कोल्हापूर जवळील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर चालुक्य देवालय भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

कोपेश्वर मंदिर, तंजावरची चोला मंदिरे किंवा खजुराहोची चांदेला मंदिरे जितकी प्रसिद्ध झाली दुर्दैवाने हे मंदिर तितकंसं प्रसिद्ध झालं नाही. इथल्या महादेवाचे नाव कोपेश्वर. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला महादेव कोपेश्वर. मग साहजिकच त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे. ते काम श्री भगवान विष्णूनी केले त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर.

खिद्रापूर च्या या कोपेश्वर मंदिराचे आणखीन एक वैशिष्टय़ असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. महादेवाच्या आधी नंदीचे दर्शन येथे नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे.

साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दाक्षिणात्य पद्धतीची आहे बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे.

या मंदिराचं खरे सौंदर्य दडलंय त्याच्या रचनेत. छोटय़ाशा दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो आणि समोर उलगडत जातो कित्येक शतकांचा इतिहास. ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आपल्याला इतिहासात नेऊन जातो.

आत जाऊन बघितल्यावर लक्षात येते संपूर्ण वर्तुळाकारात कोरलेलं आहे. ही वर्तुळाकारातील रिकामी जागा मुद्दाम ठेवण्यात आली असावी कारण या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे.

कोप्पमचे खिद्रापूर कसे झाले, याची एक आख्यायिका आहे. आपण कोप्पेश्वर मंदिरात प्रवेश करतो, तो मंडप स्वर्गमंडप म्हणून ओळखला जातो. मुख्य मंडपापासून काहीसा विलग. खुला. या मंडपाला छत नाही.

अठ्ठेचाळीस खांबांवर तोललेल्या या मंडपाला छताच्या जागी मधोमध वर्तुळाकार मोकळी जागा. या आकाशगवाक्षाच्या नेमकी खाली गुळगुळीत काळ्या दगडाची रंगशिळा आहे. एका मोठया, अखंड शिळेवर अठ्ठेचाळीस खांबांच्या आधाराने स्वर्गमंडपाचे गोल छत उभे केले आहे. अशी दुसरी स्थापत्यरचना माझ्या ऐकण्यात नाही.

या मंडपातील दगडाची चकाकी, गुळगुळीतपण लगेच लक्षात येते. येथील प्रत्येक खांबावरील कोरीव काम पाहात राहावे असे आहे. खांबांवरील कामात सुबकता आहेच, पण एका साच्यातून काढावेत इतकी एकसंधता या कामात आहे. अष्टदिक्पालांची दंपती मंडपात कोरून काढलेली आहे. छताखाली नऊ ग्रहांची मांडणी केली आहे.

स्वर्ग मंडपात रंगशिळा आहे. पूर्वी गाभाऱ्यातील देवाला सन्मुख असा रंगभोग चाले. रंगभोग म्हणजे प्रवचन, कीर्तन, नर्तन, गायन अशा प्रकारची सेवा. या रंगभोगासाठीच हा मंडप खुल्या आकाशासह तयार केला गेला असावा. आपण या मोकळ्या छतातून दिसणाऱ्या आकाशाची गंमत लुटायला, येथील स्थापत्य पाहायला जायला हवे. आणि हो, स्वर्गमंडपाच्या या छिद्रामुळेच या गावाचे नाव छिद्रापूर पडले आणि त्याचा अपभ्रंश खिद्रापूर झाला, असे म्हणतात.

पुढे सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस बारिक नक्षीदार जाळ्या घडवल्या आहेत. त्या जाळ्यांवरच्या दगडात कोरलेले हत्ती विलक्षण सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे.

पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु आत थोडं स्थिरावल्यावर आत असलेल्या रेखीव कोरीव मूर्त्या आपलं लक्ष वेधून घेतात. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.

केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत.

मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page