khelna killyache naav

शिवरायांनी बुद्धिकौशल्याने जिंकलेल्या खेळणा किल्ल्याचं नाव बदलून काय ठेवलं माहीत आहे का?

Kille

प्रतापगड च्या युद्धानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी पासून दक्षिणे कडील मुलुख जिंकत स्वराज्याचा विस्तार वाढवत नेला. २८ डिसेंबर १६५९ रोजी रुस्तमजमान विरुद्ध झालेल्या युद्धात कोल्हापूर पर्यंत चा परिसर स्वराज्यात आला होता.

कोल्हापूर च्या आसपासच्या किल्ल्यांवर स्वराज्याचा भगवा जरीपटका डौलाने फडकत होता. आता पन्हाळ्याजवळच असलेल्या खेळणा किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा डोलायला लागला की इथून बराचसा मुलुख स्वराज्याच्या अखत्यारीत येईल आणी पर्यायाने पन्हाळा अधिक मजबूत होईल. एवढं काय महत्व होतं या किल्ल्याचं हे आपण सुरुवातीला पाहुयात मग त्याचं नामकरण का केलं ते पाहुयात.

मुळात कोल्हापूर आणि आसपास चा प्रदेश घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे कोकणाच्या सीमेचे रक्षण. खेळणा किल्ला ची बांधणी ही शिलाहारकालीन आहे. या किल्ल्याची निर्मिती इसवी सन १०५८ सालची आहे. त्याकाळी या गडाचे नाव खिलागील असे होते.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेपासून थोडासा अनभिज्ञ असा हा गड आहे. हा प्राचीन किल्ला आंबा घाट, कोकणातील उतरणारे रस्ते, कोकणातील बंदरे, कोल्हापूर चा बराचसा भाग बाजारपेठ यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. इसवी सन ११९० मध्ये दुसरा भोज या राजाने खिलागील ची डागडुजी करून हा किल्ला अधिक मजबूत केला. पुढे हा किल्ला यादव, बहमनी आणि नंतर आदिलशाही यांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला त्याची माहिती देखील रंजक आहे. आदिलशाही सरदार याच्या सोबत झालेल्या कोल्हापूर च्या लढाईत मराठा सैन्य थकून गेलं होतं. पण आता किल्ला थोड्या प्रयत्नांनी जिंकून घेता येऊ शकतो.

दहा हजार आदिलशाही सैनिकांच्या विरुद्ध लढून थकलेल्या मराठ्यांना लगेचच दुसऱ्या मोहिमेवर पाठवणं जिकरीचं होतं म्हणून पुढचा किल्ला घेताना शिवरायांनी बौद्धिक लढाई करण्याचं ठरवलं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मराठा सैनिकांना हाताशी घेऊन एक योजना आखली ज्यात ते मराठे स्वराज्य सोडून आदिलशाहच्या सेवेत चाकरी करणार असल्याची बतावणी खेळणा किल्ल्याच्या किल्लेदाराला केली. किल्लेदाराला देखील त्याचं सैन्य वाढवायचं होतं म्हणून त्याने त्या मराठ्यांना आदिलशाही सैन्यात दाखल करून घेतलं.

ठराविक मराठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार खेळणा किल्ला पूर्ण फिरून पाहिला. दारू गोळ्यांचं कोठार, सैनिकी तळ थोडक्यात गडावर चालू असलेल्या सर्व गोष्टींची माहिती शिवरायांना पोहोचवत होते. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर शिवरायांनी खेळणा किल्ल्यावर हल्ला चढवला. अचानकपणे चढवलेल्या हल्ल्याने आदिलशाही सैन्य गांगरून गेलं. हल्ल्याचा प्रतिकार करण्यापुर्वी च मराठ्यांच्या तलवारीच्या तडाख्याने हा किल्ला स्वराज्यात आला.

पावनखिंडी पासून जवळपास ६ ते ७ किलोमीटर वर चौक नदीच्या किनाऱ्याजवळ नढाल गावाजवळ हा गड आहे. गडावरील विशाल टेकडीवर असल्याने पुढे या गडाचे नामकरण विशालगड असे करण्यात आले असे बऱ्याच अभ्यासकांच मत आहे. तर काही इतिहासकारांच्या मते गडावर असलेल्या विशाल देवीच्या मंदिरावून गडाचे नाव विशाळगड ठेवण्यात आले.

स्थानिक मंडळी या गडाला जिनखोड असेही म्हणतात. टेकडीवरील दगडात पाण्याचे सहा कोरीव टाके व चार गुहा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी करून विशाळगडला एक नवं रूप दिलं. कोकण आणि घाटमाथ्यावर असल्याने या किल्ल्याने कित्येक वर्षे स्वराज्यासाठी पाहरे करी म्हणून आपलं कर्तव्ये बजावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *