कात्रजचा घाट दाखवणे! या शिवकालीन म्हणी मागचा गनिमीकावा

राजकारणात या म्हणी चा सर्रास वापर होतो कारण राजकारणी केवळ सामान्य जनतेची च नाही तर स्वपक्षातील विश्वासू कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता वेळोवेळी कात्रजचा घाट दाखवत असतात. थोडक्यात काय तर समोरच्याला गोड गोड बोलून आपल्याला हवा तो डाव साधणे म्हणजे कात्रज चा घाट दाखवणे. आता ही म्हण कधी पासून वापरली आणि यात कसला गनिमी कावा होता ते बघुयात.

शाहिस्तेखान हा मुघल साम्राज्याचा एक मातबर सरदार होता. शाहिस्तेखान हा खुद्द औरंगजेबाचा च मामा. ज्याला औरंगजेब ने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला लगाम घालण्या साठी पाठवलं होतं. शाहिस्तेखानाने चाकण, सासवड, सुपे, आणि इंदापूर जिंकून स्वराज्याचे लचके तोडत होता. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला जिंकून घेतल्यावर आपल्या संपूर्ण लवाजम्यासहीत त्याने पुण्यात मुक्काम ठोकला.

पुण्यात त्याने त्याचा तळ लाल महालात ठोकला होता. शाहिस्तेखान काही केल्या हलायला तयार नव्हता. यातच गुप्तहेरांच्या मार्फत शिवाजी महाराजांना खबर आली शाहिस्तेखान इतक्यात तरी आपला तळ हलवणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा सिंहगडावर मुक्कामी होते.

शाहिस्तेखान हा स्वतःच एक मोठा सरदार असल्याने त्याच्या जवळ बराच मोठा फौज फाटा होता. त्याला युद्धात हरवणं स्वराज्यातील सैन्यांच्या मनाने फार जिकिरीचं होतं आणि अवघड देखील होतं. जर युद्ध झालंच तरी या युद्धात स्वराज्याच नुकसान जास्त होणार होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची शिकस्त कशी करायची याची योजना आखली.

तर लालमहालात राहणाऱ्या शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी एक योजना आखली. ज्यात त्यांनी त्यांच्याच एका सैनिकांच्या लग्नाचा बनाव करत नवऱ्या मुलाचे वऱ्हाडी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्यासहित दोनशे सैनिकांनी पुण्यात प्रवेश केला. लाल महालाची खडानखडा माहिती असलेले शिवाजी महाराजांनी स्वतः मोहिमेचं नेतृत्व केलं.

६ एप्रिल १६६३ रोजी शिवाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू निवडक मावळे घेऊन ते लाल महालात शिरले. ते दिवस रमझान चे असल्याने खानाचे बरेचशे सैनिक रमजान च्या उपवास मुळे आराम करत होते. त्याचा फायदा घेत मराठयांनी लाल महलावर हल्ला चढवला. आगंतुक झालेल्या हल्ल्यामुळे महालात धावपळ सुरू झाली.

अंधारातच छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखाना चा मुलगा फतेखानाचा मुलगा याला यम सदनी धाडले. शाहिस्तेखानही पळून जाण्याच्या तयारीत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी खानावर वार केला. त्यात तो महलावरून खाली पडला त्यात शाहिस्तेखानाची बोटं तुटली.

लाल महालात शिरलेले मराठे स्वतःच आरडाओरडा करत बाहेर आले. आणि बाहेरच्या सैनिकांना शिवाजी महाराजांनी हल्ला केला असं सांगत सहीसलामत लाल महालाबाहेर पडले. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मूठ भर सैनिकांना घेऊन तिथे युद्ध करणं शक्य नव्हतं. महाराजांनी आणि त्यांचे सैनिक  सिंहगडाच्या दिशेने निघाले.

शाहिस्तेखानाचं सैन्य शिवाजी महाराजाचा पाठलाग करत होतं. इथे देखील युद्ध  या सैन्याला चकवा देण्यासाठी महाराजांनी एक शक्कल लढवली. महाराजांनी बैलाच्या शिंगांना पेटत्या मशाली बांधल्या आणि हे बैल कात्रज घाटाच्या दिशेनं सोडून दिले. आणि स्वतः कोळख्या रात्रीचा फायदा घेत सुखरूप गडावर पोहोचले.

पळत्या मशाली कात्रजच्या दिशेने जात आहे असं पाहून शाहिस्तेखानाचं सैन्य कात्रजच्या घाटाच्या दिशेनं गेलं. पण कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांना लावलेल्या मशाली पाहून त्यांची फजिती झाल्याचं कळलं पण तोवर महाराज सुखरूप सिंहगडावर पोहोचले होते. शिवाजी महाराजांच्या एका गनिमी काव्यामुळं कात्रजचा घाट दाखवण्याची म्हण रूढ झाली.

Leave a Comment

You cannot copy content of this page