हिंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा’ असं म्हणणारा १५ वर्षांचा वीर क्रांतिकारक

पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता.

१९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते.

स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता.

शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात “वंदे मातरम्‌’ आणि “भारत माता की जय’ असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.

महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना “चले जाव’चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. महात्माजींच्या चले जाव आंदोलनाचे वारे देशभर पसरले.

जन आंदोलनाचा सागर उसळला, ‘भारत ठायी ठायी व्यक्ती व्यक्ती पेटली, बेचाळीस क्रांतीलागी दिव्य शक्ती भेटली’ असा तो काळ. गावोगाव तिरंगा ध्वज हाती घेऊन, ब्रिटिशांची पर्वा न करता प्रभातफे-या निघत होत्या. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. 

बलिदानाची आण घेऊ न स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी लक्षवधी जनता त्यात सहभागी होत होती. मोठय़ांचं अनुकरण छोटेही करत होते. ‘आईवरी विपत्ती, आम्ही मुले कशाला?’ असं म्हणत क्रांतिपर्वात सामील होत होते.

अशीच एक मिरवणूक निघाली दि. ९ सप्टेंबर १९४२ रोजी नंदुरबार येथे! तिच्या अग्रभागी होते हाती तिरंगा घेतलेले शशिधर नीलकंठ केतकर, लालदास शहा, घनश्याम शहा, धनसुखलाल वाणी आणि शिरीषकुमार! गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, “नहीं नमशे, नहीं नमशे’, “निशाण भूमी भारतनु’. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता.

पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि “भारत माता की जय’, “वंदे मातरम्‌’चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला.

एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, “गोळी मारायची तर मला मार!’. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्‍यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page