सह्याद्री च्या अंगाखांद्यावर अनेक किल्ले आपल्या पराक्रमाची साक्ष सांगत निधड्या छातीने उभे आहेत. छत्रपती शिवरायांनी जे ३५० हुन अधिक किल्ल्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं आणि अभूतपूर्व पराक्रम करून दाखवला. तो पराक्रम पुढच्या पिढीपर्यंत पोहचू नये म्हणून इंग्रजांनी कपटी हेतूने स्वराज्यातले गड किल्ले उध्वस्त केले.
१८१८ ला इंग्रजांनी महाराष्ट्रातील सर्व किल्ले जिंकले व त्याचे मार्ग उध्वस्त केले पण नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला याला अपवाद ठरला. कारण हरिहर जिंकल्यानंतर हरिहरच्या पायऱ्या किंबहूना या किल्ल्याचे स्थापत्य सौंदर्य पाहून खुश झालेल्या कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने या किल्ल्याला नुकसान पोहचवले नाही.
हरिहरगड ओळखला जातो तो पायऱ्यांमुळे कारण या किल्ल्याच्या पायऱ्या या जवळपास ९०अंशाच्या कोनात बांधल्या आहेत. फक्त पावसाळ्यात च नाही तर वर्षाच्या बारा महिने सह्याद्रीच्या भटक्यांसाठी हा किल्ला नेहमी आकर्षणाचा विषय राहिला आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी या किल्ल्याच्या चढाईचे फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतील. व्हिडिओ पाहत असताना अक्षरशः श्वास रोखला जातो.
गडावरील किंवा कडे कपारीत पुरातन मंदिरात कातळात म्हणजे अंदाज न लावता येणार भला मोठ्ठा दगड अश्या दगडांवर पायऱ्या कोरण्याची पद्धत ही सातवाहन काळापासून चालत आली आहे. सगळ्याच गडकिल्ल्यांच्यावर तशा पायऱ्या दिसतातही; परंतु अनेक ठिकाणी त्या कालौघात, किंवा निसर्गाच्या अवकृपेने तर काही विशेषत: इंग्रजांनी १८१८ मध्ये केलेल्या विध्वंसात नष्ट झाल्या.
नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकजवळील हर्शवाडी गावाजवळ हरिहर किल्ला मोठ्या दिमाखात विसावला आहे. हरिहर किल्ला कधी बांधला यांची नोंद अद्याप तरी नाहीये. याचा पहिला उल्लेख अढळतो तो शहाजी राजांच्या काळात हा किल्ला तेंव्हा हा किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्र्यंबकगडासोबत हरिहर किल्ला ही जिंकून घेतला.
नंतर, १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड मोगलांकडून जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. पुढे मोगल सरदार मातब्बरखान याने हरिहर किल्ला मराठ्यांकडून ८ जानेवारी १६८९ रोजी जिंकला. शेवटी, १८१८ मध्ये तो गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतिहासात अशी विविध मालकी आणि सत्ता अनुभवलेला हा गड.
पायथ्याला असलेल्या ‘हर्शवाडी’ या गावामुळे याला हर्शगड म्हणून सुद्धा ओळखतात. हरिहरगडाचा त्रिकोणी आकार, गडावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे लागणारा बोगदा आणि गडावरील भग्नावशेष अशा साऱ्याच गोष्टी हरीहर किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतात. समुद्रसपाटीपासून सुमारे ११२० मीटर उंचीवर हा गड आहे.
१८१८ साली कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या स्थापत्य शैली आणि पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच.
सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्काही लावला नाही. यावरूनही त्या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.