कातळ लेण्यांचा अनुभव देणारा स्वराज्यातील एक दुर्लक्षित गड

महाराष्ट्रात तीनशेहून अधिक किल्ले आहेत पण दुर्दैवाने काही मोजकेच किल्ले असे आहेत जे नेहमी प्रकाशझोतात असतात बरेच किल्ले आपल्याला ठाऊक देखील नसतात. असे असंख्य गडकोट आपल्या सह्य़ाद्रीत विखुरलेले आहेत.

अगदी असाच पुण्यातील एक थोडासा दुर्लक्षित असलेला हा किल्ला हडसर जुन्नरपासून १२ किलोमीटरवर! जुन्नरजवळ च्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने अंजनावळे, घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच हडसर गावाच्या डोक्यावर हा किल्ला आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले जुन्नर आणि त्याच्या आसपास असलेल्या डोंगरदाऱ्यांमुळे याच्या सौंदर्यात अधिक भर पडते. जुन्नर येथे असलेले माणिकडोह धरण ओलांडले, की एका बाजूला धरणाचे निळेशार पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगररांगा यामधून होणारा हा प्रवास निसर्गाच्या वेगळय़ाच जगात घेऊन जातो. असाच नागमोडी वाटेवरच्या छोटय़ा टुमदार घर असलेल्या वस्त्यांमधून वाट काढत काढत आपण हडसर गावात येतो. सांगण्याचा मूळ मुद्दा हाच की तसं इथे आपण वर्षभर येऊ शकतो पण पावसाळ्यात या परिसरातील सौंदर्य अधिक खुलून येतं.

हडसर किल्ल्याची उंची तब्बल ४६८७ फूट उंच आहे! त्याच्या या दर्शनामुळे सुरुवातीला तो अवघड, अशक्यच वाटू लागतो. यामुळेच की काय त्याला आणखी एक नाव पर्वतगड! सर्व बाजूने तुटलेले कडे पाहून सुरुवातीला गोंधळायलाच होते.

पण मग आपल्या चेहऱ्यावरचा हाच गोंधळ पाहून तिथला एखादा स्थानिक रहिवासी आपली वाट सोपी करून सांगतो. या गडाला खेटूनच एक वाटोळा डोंगर आहे. या दोन डोंगरांच्या दरम्यानच्या घळीतून एक लपलेली वाट गडावर जाते. दगड-गोटे आणि हिरव्यागार झाडांनी भरलेली ही वाट तशी खडतरच आहे.

पण निसर्गसौंदर्य पाहत पाहत या साऱ्या अडचणी आणि शेवटचे छोटेसे प्रस्तरारोहण करत या दोन डोंगरांदरम्यानची खिंड गाठली की, आपण हडसरच्या मुख्य मार्गाला येऊन मिळतो.

खिंडीतील गडाचा राजमार्ग ऐन कड्यात खोदलेला आहे. हडसरचा हा मार्ग आज जरी दुर्गम झालेला असला तरी गडाच्या प्रवेशद्वारात हजर झालो की, कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग, निसर्गतःच तासलेले कातळाचेच कठडे, कातळात च खोदून काढलेली दोन अत्यंत देखणी रेखीव प्रवेशद्वारे, त्यावरच्या त्याच्या त्या लयबद्ध कमानी, भोवतीचे बुरुज, भग्न अवस्थेत असलेली अवशेष कातळात कोरलेले सभामंडप एकूण काय किल्ल्यावर असलेलं हे कातळी खोदकाम पाहून आपण कोणत्या लेणे पहातोय काय असाच भास होतो.

महाराष्ट्रातील दुर्गसंपदेचा अभ्यास करायचे ठरवले तर हडसर च्या उल्लेखा शिवाय अपूर्णच होईल. या किल्ल्याची निर्मिती साठी सातवाहनांच्या काळात जावे लागेल. कारण याची निर्मिती सातवाहन काळातील आहे.

सातवाहनांची बाजारपेठ जुन्नर, तर या बाजारपेठेसाठी या राजवटीतच नाणेघाट या व्यापारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठीच जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. सातवाहन, यादव यांचे राज्य गडावर नांदले.

पण त्यानंतर पारतंत्र्यात विस्मरणात गेलेला हा गड एकदम चर्चेत आला तो थेट इसवी सन १६३७ मध्ये. ज्या पाच किल्लयांच्या मदतीने शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, त्यामध्ये या हडसरचा समावेश होता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी चावंड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि हडसर हे किल्ले जिंकून घेतल्याचा हा उल्लेख आहे. नैसर्गिकरित्या कातळाच्या तासून भक्कम झालेल्या पर्वतासारख्या उंच भिंती मुळे बहुधा गडाचे ‘पर्वतगड’ हे नामकरणही याच काळात झालेले असावे. कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या बखरीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असाच करतात.

मुघलांच्या नोंदीत या गडाचा उल्लेख ‘हरसूल’ असा येतो. पेशवाईत मात्र हा गड मराठय़ांकडेच असल्याच्या स्पष्ट नोंदी आहेत. अगदी तो शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धापर्यंत त्यांच्याकडेच होता. इसवी सन १८१८ च्या या युध्दावेळी मेजर एल्ड्रिजने जुन्नर जिंकल्यावर जुन्नरचा किल्लेदार हडसरवर मुक्कामी आला होता.

Leave a Comment

You cannot copy content of this page