गोरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे त्याला ढोबळ मानाने गनिमीकावा म्हटले जाते. यात शत्रू पक्षाच्या बलाढ्य सैनिकांना अतिशय कमी संख्यबळाने गनिमीकाव्याने जेरीस आणता येते.
ज्यात बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेऊन पुन्हा अनेक छुपे हल्ले करून शत्रूचं होईल तितकं मनोधैर्य करणं. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वत रांगात ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे.
स्वराज्य संकल्पक शहाजीराजांनी भातवडीच्या युध्दात या पद्धतीचा वापर अतिशय प्रभावी पणे केला. छत्रपती शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप होते ज्यात महाराजांनी या युद्धनितीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला.
ज्यात मुख्यत्वे शत्रूला घाबरविणे, मानसिक खच्चीकरण करणे आर्थिकदृष्ट्या जेरीस आणणे, शत्रूला कोंडीत पकडणे जेणे करून तो शरण येण्यास बाध्य होईल.
शत्रूला लढाई मैदान सोडून पळून जाईल अशी परिस्थिती निर्माण करणे. जाणीवपूर्वक चुकीची माहिती पुरावून त्याची दिशाभूल करणे. आपण दुर्बल असल्याची बतावणी करून शत्रूवर त्वेषाने तुटून पडणे. शरण येण्याची बतावणी करून एकदम हल्ला करणे. याचा वापर करून स्वराज्याच स्वप्न साकारलं जात होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापर केलेल्या या युद्धतंत्राचा अर्थ नेमका काय आहे. तर गनिमीकावा या शब्दाची फोड करून बघुयात ‘गनीम’ हा शब्द मूळ फारसी भाषेतला आहे.
मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या संदर्भात होत असल्याने गनीम म्हणजे मराठ्यांचा शत्रू असा अर्थ निघतो. तर ‘कावा’ म्हणजे ‘फसवणूक’ किंवा कपट म्हटलं जातं. ‘शत्रूवरचा कपटयुक्त हल्ला’ अथवा ‘कपट-युद्ध’ असा ‘गनिमी कावा’ या संज्ञेचा अर्थ निघतो.
मराठ्यांनी खेळलेल्या लढायांत आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ सर्वार्थाने अधिक होते. मग ते युद्धसामग्री च्या बाबत असो किंवा धन व कोशबळ यांच्या बाबतीत असो या दोन्ही सत्ता वरचढ आणि ताकदवान होत्या. असे असताना त्यांचा युद्धात झाला पराभव जिव्हारी लागण्यासारखा नक्की होता.
साहजिक त्यांच्या दृष्टीने मराठ्यांचा विजय हा कपटाने केला कारण हे समोरासमोर झालं असतं तर शत्रू ने लढाई सहज जिंकली असती. शत्रूंच्या दृष्टीने मराठे गनीम असल्याने त्यांनी केलेली नीती ही कपटाची असल्या कारणाने त्यांच्या दृष्टीने हा ‘गनिमीकावा’ होता.
त्यामुळे ‘गनिमी कावा’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. शत्रूने केलेली अवहेलना मराठयांनी मानाची बिरुदावली समजून स्वीकारली. पण या युद्धतंत्राच्या वापरात मराठ्यांनी परिस्थिती नुसार वेळोवेळी त्यात बदल करून शत्रू वर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं.
nice