digvijay mohim

फारसा रक्तपात न होता स्वराज्यात आलेला तमिळनाडू शहरातील एक महत्वाचा किल्ला

Kille

छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली दक्षिण दिग्विजय मोहीम इतिहासात बरीच चर्चलेली मोहीम होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हळू हळू वाढवलेलं स्वराज्य आता मराठी मुलुखाबाहेर पोहोचलं होतं.

६ ऑक्टोबर १६७६ हा दसऱ्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली. स्वराज्याच्या बळकटीकरण करण्यासाठी विविध मोहीम त्यांनी हाती घेतल्या आणि त्या यशस्वी पार पाडल्या. यापैकीच एक महत्वाची मोहीम ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला स्वराज्यात घेतला.

जिंजी किल्ला देखील फार रक्तपात न होता सहज पणे स्वराज्यात आला. याच पद्धतीने शिवरायांनी वेल्लोर किल्ला घेण्यासाठी प्रयत्न केला. २२ जुलै १६७८ रोजी वेल्लोर चा किल्ला स्वराज्यात आला. 

वेल्लोर हे नाव तमिळमधील आहे त्याचा अर्थ भाल्यांचे शहर म्हणजेच युद्धाचे ठिकाण किंवा रणांगण असा आहे. वेल्लोर हे शहर प्राचीन असल्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. साधारण इ. स. ९०० पासून या संदर्भात माहिती मिळते.

तिरुवन्नमलाई येथील एका शिलालेखात वेल्लोरचा प्रथम उल्लेख दिसून येतो. वेल्लोर शहर हे पल्लव, चोल, राष्ट्रकूट, तसेच विजयनगर या सारख्या मोठ्या राजकीय अधिपत्याखाली होते.

इ.स.१५६६ मध्ये विजयनगर राजवटीत सदाशिव राय यांच्या चिन्ना बोम्मी रेड्डी आणि थिम्मा रेड्डी नायक यांनी हा किल्ल्याची डागडुजी करून नव्याने बांधला आणि किल्ला अधिक बळकट केला किल्याच्याभोवती खंदक असून किल्ल्याच्या संरक्षणासाठी खंदकात पाणी आहे ज्यात जिवंत मगर व सुसर होत्या. विजयनगरनंतर हा किल्ला मुघलांच्या अधिपत्याखाली आला.

जिंजीच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याकडे लक्ष वळविले. वेल्लोर किल्ला घेण्यामागे शिवरायांची भूमिका अशी होती की, या किल्ल्याचं संरक्षण करणारे बेलाग बुरुज आणि मजबूत तटबंदीमुळे हा किल्ला सहजासहजी जिंकता येणं केवळ अशक्य.

त्यातही कोणी आडवाटेने किंवा लपूनछपून किल्ल्यावर येण्याचा प्रयत्न केला तर किल्ल्याच्या भोवतालच्या बाजूने खोदलेल्या खंदकात सदैव पाणी असायचे आणि त्यात मगरी-सुसरी सोडलेल्या होत्या. त्यामुळे हा दुर्ग जिंकण्यासाठी अश्यक्य मानला जायचा.

इसवी सन १६७७ च्या मे महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोरला वेढा घातला. त्यावेळी वेल्लोर चा किल्लेदार होता अब्दुल्लाखान. या हबशी किल्लेदाराने वेल्लोर चा किल्ला वर्षभर झुंजवत ठेवला. वेल्लोर किल्ला जिंकण्यासाठी या किल्ल्या जवळ जवळ दोन टेकड्या आहेत. त्यावर साजिरा-गोजिरा अशी मराठमोळी नावे देऊन टेहळणी व हल्ल्याची दोन ठिकाणे तयार करण्यात आली.

या दोन ठिकाणांवरून मराठी फौजा तोफांची सरबत्ती करू लागल्या. किल्ला घेण्याची जबाबदारी मराठा सरदार नरहरी रुद्र यांच्याकडे होते. किल्ल्यात साथीचा रोग पसरल्यामुळे अब्दुल्लखानाचा नाईलाज झाला. रघुनाथपंत हनुमंते व नरहरी रुद्र यांनी या संधीचा फायदा घेऊन.

२२ जुलै १६७८ रोजी ५० हजार होन देऊन मराठ्यांनी वेल्लोरवर भगवा जरीपटका फडकवला. अशा प्रकारे शिवाजीराजांनी फारसे रक्त न सांडता दक्षिणेत आपले अस्तित्व निर्माण केले. वेल्लोर ही विजयानगरची शेवटची राजधानी. १६७८ ते १७०७ पर्यंत किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो पुन्हा मुघलांकडे गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *