नुकतेच कोल्हापूर चे छत्रपती संभाजी राजे यांनी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रेंचे नाव देण्याची मागणी सोशल मीडिया च्या माध्यमातून केली आहे.
अर्थात ही मागणी महाराष्ट्रा बरोबर देशातील तमाम शिवभक्तांच्या तसेच इतिहासप्रेमींच्या मनातली ही मागणी असून, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमची मागणी पूर्ण करेल हा विश्वास आहे. कोकणच्या या सुपुत्राची दखल साऱ्या जगाने घेणं गरजेचं असल्याचंही मतही छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केलं आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे अलौकिक कार्य आपण जाणतोच आहे. महाराजांनी अनेक क्षेत्रात महान आणि काळाच्या पुढे जाऊन कार्य केले. आपणांस हा इतिहास बऱ्यापैकी ठाऊक आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून आरमाराची स्थापना केली होती. म्हणून आजही महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. महाराजांनी त्या काळात आरमाराचे महत्त्व ओळखून स्थापन केली जेव्हा समकालीन राज्यकर्त्यांनी विचारही केला नसेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात कान्होजी आंग्रे हे प्रसिद्ध नाविक योध्ये होते. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे त्यांचे मूळ गाव व संकपाळ हे मूळ आडनाव.
काळोसेतील आंगरवाडी या भागामुळे त्यांस आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले आणि पुढे तेच नाव सर्वार्थाने रूढ झालं. कान्होजींचे वडील तुकोजी हे देखील स्वराज्यातील आरमारात निष्ठावंत सरदार होते. ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात २५ असामींची सरदारी होती असे म्हणतात.
औरंगजेब मराठ्यांना जिंकण्यासाठी वैतागून आणि चिडून १६८१ सालच्या च्या शेवटी महाराष्ट्रात आला. त्या वेळी कान्होजींच्या कोकणपट्टीतील कार्यास सुरुवात झाली.
१६९४ पासून ९८ पर्यंत त्यांनी कोकणपट्टीतले बरेचसे किल्ले मोगल, इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी काबीज केलेले होते. जे मराठ्यांनी आपल्या कर्तृत्वाने परत घेतले. छत्रपती राजारामांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यांस ‘सरखेल’ हा किताब दिला. १६९६ मध्ये त्यांनी कुलाबा किल्ला जिंकून ते स्वराज्याचे आरमाराचे मुख्य ठाणे केले. पुढे राजारामांनी त्यांस मराठी आरमाराचा मुख्याधिकारी केले.
राजारामांच्या मृत्यूनंतर थोड्याच वर्षांत संभाजी महाराजांचे पुत्र शाहूं महाराजांची सुटका होऊन १७०७ मध्ये ते छत्रपतींच्या गादीवर आले. त्या वेळी राजारामांची पत्नी ताराबाई व पुतणे शाहू ह्यांत गादीबद्दल वाद सुरू झाला. कान्होजींनी ताराबाईंचा पक्ष घेऊन १७०७ ते १७१० या काळात अनेक विजय मिळविले.
ताराबाईंनी सावंतवाडी ते मुंबईपर्यंतच्या किनाऱ्याच्या संरक्षणार्थ मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख म्हणून त्यांस नेमले आणि इंग्रजांच्या मदतीने शाहूंनी कोणतीही हालचाल करू नये, या हेतूने राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास कान्होजींना सांगितले. १७१३ साली छत्रपती शाहूंनी कान्होजींविरुद्ध बहिरोपंत पिंगळे ह्यांस त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी धाडले.
कान्होजींनी त्यांचा पराभव करून त्यांस कैद केले. त्यामुळे शाहूंनी बाळाजी विश्वनाथ या पेशव्यास कान्होजींवर धाडले. बाळाजीने कान्होजींबरोबर सलोखा करून तह केला. त्यात कान्होजींस १० जंजिरे व १६ किल्ले मिळाले व त्यांनी शाहूचे अंकित बनून सालिना १२,००० रु. त्यास देण्याचे ठरले. त्याशिवाय त्यांची सरखेली त्यांजकडे कायम करण्यात आली व सर्व आरमाराचे आधिपत्य त्यांस दिले. अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात सामील झाले व अखेरपर्यंत त्यातच निष्ठेने राहिले.
कान्होजींची सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवेपासून त्रावणकोरपर्यंत पसरली. ही गोष्ट तत्कालीन इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व डच ह्या परकीयांस आणि जंजिऱ्याच्या सिद्दीस बोचत होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच ह्यांनी कधी स्वतंत्रपणे, तर कधी संयुक्त रीत्या त्यांवर चढाई केली. पण प्रत्येक वेळी त्या सर्वांचा पराभव झाला.
आंग्र्यांच्या अंमलाखालील सागरी प्रदेशांतून ये-जा करणाऱ्यास दस्तक (परवाना) घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निरपवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी गोद्या बनविल्या. त्यांची जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत.
कान्होजी सुद्दढ व प्रेमळ होते. तथापि त्यांचे हुकूम सक्तीचे व शिक्षा कडक असे. त्यांना मथुराबाई, लक्ष्मीबाई व गहिनाबाई या तीन धर्मपत्नी होत्या. त्यांना सहा मुलगे झाले. असा हा सागरी अनभिषिक्त राजा अलिबाग येथे मरण पावला. त्यांच्या मरणानंतर त्यांच्या मुलांत तंटे सुरू होऊन पुढे आंग्रे घराण्याची वाताहत झाली.