सात वर्षे शत्रुला झुंजत ठेवायला लावणारे छत्रपती राजाराम महाराज

२६ सप्टें १६८९ रोजी १९ वर्षीय राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह शत्रूस चकवून पन्हाळगड सोडला व ३३ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर २८ ऑक्टो १६८९ ला ते वेल्लोरच्या किल्ल्यात पोहोचले. राजाराम महाराज जिंजीकडे निघून गेल्यानंतर व इकडे महाराष्ट्रात रायगड शत्रूच्या हाती पडल्यावर खरे तर मराठी राज्यात काही अर्थच उरला नव्हता.

हा अर्थ मराठी राज्यात पुन्हा भरण्याचे महान कार्य रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे व धनाजी जाधव या चार पुरुषश्रेष्ठांवर महाराजांनी सोपविले होते. हा मराठी राज्याचा पुनर्जन्मच होता, त्यांनी जणू नवेच राज्य पैदा केले.

स्वतःच्या अनुपस्थितीत १६९० मध्येच महाराजांनी महाराष्ट्रातील राज्यकारभाराच्या कामाची केलेली विभागणी खालीलप्रमाणे- दक्षिण कोंकण व देशावरील साताऱ्याच्या दक्षिणेकडील प्रदेश- रामचंद्रपंतांकडे, सेनानी- संताजी घोरपडे. उत्तर कोंकण व देशावरील साताऱ्याच्या उत्तरेकडील प्रदेश- शंकराजी नारायण, सेनानी- धनसिंग उर्फ धनाजी जाधव.

महाराजांनी कर्नाटकातील जिंजीत नवी राजधानी उभी केली. सुज्ञपणे महाराष्ट्राचा कारभार रामचंद्रपंत व शंकराजी नारायण या दोन प्रधानांकडे सोपविला. महाराजांच्या महाराष्ट्रातील लढाईतील गैरहजेरीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे कार्य शूर संताजी घोरपडे व धनाजी जाधव या द्वयीने केले. स्वराज्याच्या या चार सेवकांनी अनेक नेत्रदीपक विजय संपादन केले.

२७ ऑगस्ट १६९० ला झुल्फिकारखान जिंजीच्या परिसरात येऊन पोहोचला व त्याचा जीजी किल्ल्यास वेढा चालू झाला. महाराजांनी ७-८ वर्षे या वेढ्याविरोधात काम केले.

महाराष्ट्रात स्वराज्य स्थिरावतेय असे दिसल्यावरून, अखेर राजाराम महाराज ३० डिसें १६९७ ला त्यांच्या राण्यांसह जिंजीबाहेर निसटून वेल्लोर किल्ल्यात पोहोचले व आपल्या सैनानिशी महाराष्ट्रात मार्च १६९८ ला सुखरूप पोहोचले.

लंडन येथील ब्रिटिश म्यूझीयममधील मॅकेंझी संग्रहात रामचंद्रपंत अमात्य यांची १६९७ मधील दोन पत्रे उपलब्ध आहेत. त्यांपैकी एक राजाराम महाराजांना तर दुसरे प्रल्हाद निराजींना लिहिलेले आहे. या पत्रांतून राजारामांच्या वरील योजनेस दुजोरा मिळतो. 

१६९८-९९ मध्ये राजारामांनी खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले, धनाजी जाधव यांच्या बरोबर वऱ्हाड-खानदेशात स्वारी केली होती. परंतु स्वारीची दगदग सहन न झाल्याने छत्रपती राजारामांना सिंहगड येथे नेण्यात आले. अतिश्रमाने २ मार्च १७०० ला सिंहगडावर त्यांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी देहावसान झाले.

महाराजांची कारकीर्द फक्त ९ वर्षांचीच होती व ती सर्व महाराष्ट्राबाहेरच होती. त्यामुळे त्यांना स्वतःला युद्धातील कौशल्य दाखवायला फारसा वाव मिळाला नाही. तरी त्यांनी आपल्या हाताखालच्या माणसांना ते दाखविण्यासाठी चांगले प्रोत्साहन दिले.

Leave a Comment

You cannot copy content of this page