एका बाजूने शिवलिंगाच्या आकाराची तर आकाशातून चावीच्या आकाराची पेशवेकालीन विहीर

बदलापूर रेल्वे स्टेशन पासून सुमारे नऊ किलोमीटर दूर देवळोळी गाव हे फार देखणं गावं आहे. या गावात एक विहीर आहे जीला पाहण्यासाठी साठी बरेच पर्यटक येत असतात. कारण या विहिरीचं वैशिष्ट्य ही तितकंच खास आहे. ही विहीर अंदाजे तीनशे वर्षांपूर्वी बांधली आहे.

ऐतिहासिक वैशिष्ट्ये तर आहेच परंतु पर्यटकांना आकर्षित करतो तो या विहिरीचा आकार. या विहिरीला बाजूने पाहिलं तर तिचा आकार महादेवाच्या पिंडीप्रमाणे दिसतो. आणि जर आकाशातून पाहिलं तर चावीच्या आकाराची ही विहीर दिसते. या विहिरीला बारमाही पाणी उपलब्ध होते. 

चावीच्या आकाराची ही विहीर चिमाजी अप्पा यांनी बांधली असे म्हणतात. त्याकाळातील हा व्यापारी मार्ग पुण्यातून कल्याण पर्यंत होता. चिमाजी अप्पा यांचं सैन्य पुण्याहून कल्याण व पुढे जाण्यापूर्वी त्यांचे सैन्य बदलापुरच्या या भागात तळ करून होते. त्या काळात त्यांनी प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी त्यांच्या सैन्यासाठी व घोड्यांच्यासाठी ही विहीर बांधली असण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात मात्र विहिरीच्या बांधकामावर शिलालेख अथवा सनावळ्या कोरलेल्या नाहीत. स्थानिक लोकांच्या देखरेखीमुळे विहिरीत आजही स्वच्छ पाणी असून या विहिरीचा तळ हा स्पष्ट दिसतो. या विहिरीच्या जवळूनच उल्हास नदी वाहत असल्याने या विहिरीत नैसर्गिक झऱ्यांमुळे पाणी येते.

पारंपरिक विहिरी प्रमाणे गोल आणि मग नंतर निमुळती असल्याने या विहिरीचा आकार मंदिरात जशी शिवलिंग असते अगदी त्याप्रमाणे या विहिरीचा आकार भासतो. यात विहिरीत उतरण्यास काटकोनात कोरलेल्या पाषाणी पायऱ्या असून आत चार-पाच पायऱ्या उतरल्यावर दोन बाजूला दिवे किंवा मशाली लावण्यासाठी कोनाडे आहेत. तसेच विहिरीच्या मुख्य द्वारावर गणपती व अन्य दोन देवतांच्या मूर्ती असून त्यातील एक मूर्ती शस्त्रधारी आहे.

या मूर्तीच्या बाजूच्या भिंतीवर दोन मुखभंग झालेल्या सिंहाच्या मूर्ती आहेत त्या कदाचित शरंभा च्या असाव्यात. तसेच या द्वाराची कमान गोलाकार असून त्यावर फुले कोरण्यात आली असून विहिरीचा प्रत्येक दगड हा एकमेकांमध्ये सांधेजोड पद्धतीने अडकवून बसवलेला आहे.

मागच्या चार पाच वर्षांपूर्वी जेंव्हा पावसाने दडी मारल्याने जी पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी याविहिरीचा पुन्हा जीर्णोद्धार झाला. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत साचलेला गाळ पुन्हा उपसून काढला. माती अन विटांचा जवळपास दहा टन गाळ काढल्यावर या विहिरीचे नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुन्हा खुले झाल्याने. ही विहीर आजही बदलापूर च्या देवळोळी ग्रामस्थांची तहान भागवते.

Leave a Comment

You cannot copy content of this page