महाराष्ट्रामधील एकमेव अर्धनारीनटेश्वर मंदिर वेळापूर माहिती आणि इतिहास

पुणे-पंढरपूर महामार्गावर माळशिरस तालुक्यामध्ये वेळापूर या ठिकाणी चालुक्यकालीन अर्धनारीनटेश्वराचे सुंदर मंदिर आहे. वेळापूर हे ठिकाण देवगिरीच्या यादवांच्या काळात भरभराटीस आले होते. हे ठिकाण देवगिरीची दक्षिण सीमा आहे. त्या काळी हे ठिकाण सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात होते.

या मंदिराचा जीर्णोद्धार बाईदेवराणा यांनी केला असा उल्लेख येथील शिलालेखात आढळतो. शिलालेखात दिलेल्या माहितीनुसार 1305 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना केल्याचे दिसते. तसेच मंदिरामध्ये असलेल्या शिलालेखांवरून यादव राजांनी या मंदिराला देणगी दिल्याचे उल्लेख देखील दिसतात.

वेळापूरचे हे मंदिर त्याच्या भिन्न शिल्पकलेमुळे प्रसिद्धीस पावले आहे. मंदिरा समोरच एक मोठी बारव आहे. या बारवमध्ये बाराही महिने पाणी असते. याला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख आढळतो. येथील देवकोष्टकात देवदेवतांच्या मुर्त्या आहेत.

समोर भव्य नंदीमंडप, सभागृह, सभागृहा मधील कक्षासने ही सर्व रचना अत्यंत सुंदर आहे. सभागृहात डाव्या बाजूला असणाऱ्या सप्तमातृका आणि गर्भगृहाच्या स्तंभावर चालूक्यकालीन सुंदर नक्षीकाम हे शिल्पकाम पाहणाऱ्यासा आकर्षित करते. तसेच या मंदिराचे आणखीन एक खास वैशिष्ट्य असे की गर्भगृहाच्या द्वारशाखेवर असलेली गजलक्ष्मी. ही फार कमी ठिकाणी पाहायला मिळते.

या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे गर्भगृहामध्ये मोठ्या दगडी शिळेवर असलेली शाळुंका आणि त्यावर शंकर आणि पार्वती यांच्या अलिंगण स्थितीतील सुंदर मुर्त्या. या शिळेवर कीर्तिमुख, विष्णू, उंदीर, गणपती तसेच इतर प्रतिमाही कोरलेल्या दिसतात.

ही मूर्ती पाहून असे म्हणता येईल की शिल्पकाराने अत्यंत उच्चप्रतीची शिल्पाकृती उभारण्याचे काम येथे केलेले आहे. अर्धनारी नटेश्वराच्या अंगावरील सुंदर अलंकार शोभून दिसतात. या मूर्तीची सर्वसाधारण उंची 115 मीटर असावी. ही देखणी अर्धनारीनटेश्वरची मूर्ती प्रत्येक भक्ताला आकर्षित करते.

मंदिराच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या काही मुर्त्या या पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात आहेत. यातील काही मुर्त्या इतक्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत की या मूर्तींवर हात फिरवला अथवा टिचकी मारली तर त्यातून सप्तसूर निघतात. अशा मुर्त्या फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतात. त्यातीलच वेळापूर हे एक ठिकाण.

वेळापूर हे ठिकाण पंढरपूर-आळंदी या पालखी मार्गावर वसलेले ठिकाण आहे. पंढरपूरपासून 32 किलोमीटर अंतरावर हे कलापूर्ण मंदिर आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page