निसर्गाच्या अदभूत विश्वात घेऊन जाणारा माहुली गड

माहुली गड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर डोंगररांगेतील हा किल्ला पावसाळी ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. ठाणे जिल्ह्यात शहापूर आसन गावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे.

माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो.

माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या व इतिहासाच्या पाउलखुणांचा साक्षीदार असणारा माहुली किल्ला हा शहापुरचे ऐतिहासिक वैभव आहे. गिरीभ्रमण करणाऱ्या सर्वच गिर्यारोहकांचा हा आवडता किल्ला असल्याची साक्ष येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवरून स्पष्ट होते.

माहुली हा सर्वात उंच किल्ला असून त्याची समुद्रसपाटी पासूनची उंची २८१५ फूट आहे. माहुलीच्या किल्ल्याचे सुळके मुंबई-नाशिक महामार्गावरूनही दिसतात. या सुळक्यांना स्थानिकांनी नवरा-नवरी, नव-याची करवली, नवरीची करवली अशी नांवे ठेवली आहेत. लोक काय हो देवाला पण नावं ठेवतात. माहुलीवरील टाक्यांकडून भंडारगडाच्या दिशेने जाताना दोन शिल्पे असून त्यांचे चेहरे डूक्करांसारखे आहेत. म्हणून त्याला डूक्करतोंडी शिल्पे असे म्हणतात.

पायथ्याजवळील मंदिराच्या परिसरात पडलेल्या विरगळ प्रमाणे येथे सुद्धा एक विरगळ आहे. मध्यभागी काही ज्योतीसुद्धा आहे. त्याच्यापुढे एक तळे व काराविमध्ये हरवलेली माहुलेश्वर मंदिराची जागा आहे.

भंडारगडावर दहा खांबांचा एक हत्तीखाना असून येथे कायम थंडगार पाणी असते. माथ्यावर पश्चिम दिशेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा कल्याण दरवाजा आहे. इ.स. १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोकणातील अनेक किल्ले जिंकले. त्यावेळी माहुलीचा किल्लाही त्याने सर केला.

१६३६ मध्ये शहाजीराजांनी शिवबा व आईसाहेबांसह माहुलीचा आश्रय घेतला. मोगल सेनापती खानजमानने माहुलीस वेढा दिला. शहाजीराजांनी किल्ला शेवटपर्यंत लढवला पण त्यांना अपयश आले. पुढे हा किल्ला निजामशाहीच्या अस्ताचा जणू साक्षीदारच ठरला.

८ जानेवारी १६५८ रोजी शिवाजीरांनी हा किल्ला मोघलांकडून जिंकला पण दुर्दैवाने १६६६ च्या पुरंदरच्या तहात मोगलांना परत केला. उत्तरेला पळसगड, दक्षिणेस भंडारगड व मध्यावर माहुली असे तीन भाग आहेत. म्हणजे वेगवेगळे किल्ले आहेत असे दर्शविले गेल्याने चक्कदोन गड वाचले.

इस १६७० मध्ये महाराजांनी दीड हजार मावळ्यांसमवेत रात्री अचानक छापा टाकून गड काबीज करण्याचा प्रयत्न केला. परंतु माहुलीचा रजपूत किल्लेदार मनोहरदास गौंड याच्या दक्षतेमुळे अपयश आले. 

१६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर मोरोपंत पिंगळे यांनी माहुली पळसगड व भंडारगडा हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले. त्यानंतर माहुलीवर मराठ्यांचे निषाण फडकले. तेव्हापासून इ. स. १८१७ मधील इंग्रज व पेशवे यांच्या तहापर्यंत या किल्ल्याचे स्वामित्व मराठयांकडे होते.

पुढे तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या पायथ्याशी इतिहासाची साक्ष देणारी पेशवाईच्या सरदारांची कचेरी, त्यांचे वाडे व इतर बारा बलुतेदारांचे वाडे तसेच शेती होती. अजूनही काही वाडयांचे अवशेष आजही पाहायला मिळतात.

शिवपदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याच्या पुर्वेस आजोबा आग्नेय भागात हरिश्चंद्रगड, भैरवगड, नाणेघाट, जीवधनगड, गोरखगड, सिध्दगड, भिमाशंकरचे पठार, तुंगी, दक्षिणेस माथेरान, चंदेरी, नैऋत्येस मलंगगड, पश्चिमेस वज्रेश्वरी, वायव्येस क्रोहोज, उत्तरेस तानसा तलाव, ईशान्येस अलंग-कुलंग-मदन, रतनगड आदी विस्तीर्ण प्रदेशाचे विहंगम दृष्य पहायला मिळते.

माहुली गावांच्या पायथ्याशी शंभू महादेवाचे मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, एडकाबाई देवीचे मंदिर अशा चार मंदिरांचे दर्शन होते. गडावर जाताना प्रथम दर्शनी गडाचे देखणे प्रवेशद्वार प्राचिन शिल्पकलेची साक्ष देते.

पायवाटेने गेल्यास मात्र लोखंडी शिडीने गडावरील डोंगरमाथ्यावर, पठारावर जाता येते. डोंगरमाथ्यावर  पेशवेकालीन इमारतीचे भग्न अवशेष पहावयास मिळतात. येथे समोरच एक थंडगार, निळाशार  पाण्याचा हौद व जवळच मोठा तलाव व जवळ महालाच्या भितींचे भग्नावशेष दिसतात. या किल्ल्यावरील अवघड पायवाट व त्यावरील उंच सुळके कायमच साहसी गिर्यारोहकांना आकर्षित करतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page